Sunday, January 26, 2014

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - ४



उद्योग व्यापारामध्ये खरेदी केलेल्या वस्तू विक्री करावयाच्या वस्तू यांच्या साठ्यामध्ये  संख्या किंमत या दोन्ही गोष्टींचे मूल्यमापन त्यावर नियंत्रण करणे कसे महत्वाचे आहे हे आपण पाहिले. आता या वस्तूभांडार व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर कसे तयार करायचे ते पाहू.

कोणतेही सॉफ्टवेअर तयार करताना आवश्यक ती सर्वप्रकारची माहिती योग्यप्रकारे साठविण्याची व्यवस्था करावी लागते. ही माहिती संकलित करण्यासाठी डाटाबेसचा वापर केला जातो.   अशा डाटाबेसमध्ये माहिती भरणे, त्यात बदल करणे व त्या माहितीच्या आधारे आवश्यक ते निष्कर्ष अहवाल तयार करण्यासाठी विशिष्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर करून संगणाक प्रणाली विकसित करावी लागते. 

एमएस अक्सेस(MS Access) ,  ओरॅकल(Oracle), एमएस एसक्यूएल(MS SQL), माय एसक्यूएल (MySQL), जेडीबीसी(JDBC) यातील कोणत्याही डाटाबेसचा यासाठी वापर करता येतो. विंडोज लिनक्स या दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये MySQL हा डाटाबेस वापरता येतो.शिवाय तो मोफत उपलब्ध असून पीएचपी (PHP) प्रोग्रॅमद्वारे त्याचे  संचालन करता येते. त्यामुळे प्रस्तुत लेखात माय एसक्यूएल डाटाबेस पीएचपी प्रोग्रॅम यांचा वापर करून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कसे तयार करता येईल याची प्राथमिक ढोबळ स्वरुपाची माहिती दिली आहे.  

इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी  मुख्यत्वे तीन प्रकारची माहिती संकलित करावी लागते.  

. वस्तू (goods)आपण ज्या व्यक्ती वा संस्थांकडून विकत घेतो (vendors, suppliers or purchase parties) ज्या व्यक्ती वा संस्थांना विकतो (customers or sale parties). त्यांचे संपर्क  पत्ते इतर माहिती .  या माहितीसाठी डाटाबेसमध्ये सप्लायर्स व कस्टमर्स या नावा्ची  दोन टेबल तयार करावी लागतात.   

. खरेदी वस्तू  विक्रीवस्तू  गटवार (category) वर्गीकरण करून  यांच्या गुणविशेषांची ( specifications) सविस्तर  माहिती. खरेदीवस्तूंसाठी कॅटेगरी (raw_ item_category )व त्यातील वस्तू  ( raw_items)  तसेच विक्रीवस्तूंसाठी प्रॉडक्ट कॅटेगरी (product_category )व त्यातील वस्तू  ( products)  अशी चार टेबल करावी लागतात.

. खरेदी विक्री व्यवहारातील वस्तूंची संख्या (quantity)  रक्कम (amount)  यांच्या  आदानप्रदानाची ( transactions)  सविस्तर तारीखवार नोंद. यातील पर्चेसपार्टीकडून पाठविलेल्या बिलातील खरेदी नोंदींसाठी  (purchase_order)  तर विक्री नोंदींसाठी इन्व्हॉईस किंवा सेल्सबिल (invoice  or cash_credit_bill)  अशा दोन प्रकारची टेबल तयार करावी लागतात. 

 खरेदी व विक्री बिलात बिल नंबर, तारीख, सप्लायर वा कस्टमरचे नाव, पत्ता, वॅट नंबर, खरेदी केलेल्या वा विक्री केलेल्या वस्तूंची यादी, माहिती, संख्या, किंमत व एकूण रक्कम, तसेच वॅट, सीएसटी सारखे कर, ट्रॅन्स्पोर्ट व पॅकिंग इत्यादी इतर बाबींची नोंद असल्याने त्यासाठी  वेगवेगळ्या टेबलमध्ये अशी माहिती ठेवली जाते. 

पीएचपी प्रोग्रॅमद्वारे अशा विविध टेबलमधील माहिती निवडून खरेदीविक्रीच्या व्यवहाराप्रमाणे वस्तुभांडारातील वस्तूंच्या संख्येत व वस्तुभांडारातील वस्तूंच्या एकूण किंमतीत होणारे बदल नोंदविता येतात. उत्पादन व विक्री विनाखंड चालू रहावी पण त्याचवेळी वस्तुभांडारात कमीत कमी भांडवल गुंतून रहावे यादृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्यासाठी लागणारे निष्कर्ष रिपोर्ट  अशा नोंदींच्या आधारे तयार करता येतात. हे कार्य ही पीएचपी प्रोग्रॅमद्वारे केले जाते.

Thursday, January 23, 2014

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - 3

वस्तूंची विक्री - उत्पादन केलेल्या वस्तू विक्री होईपर्यंत विक्रीवस्तूभांडारात ठेवल्या जातात. विक्रीवस्तूभांडारातील तयार वस्तूंची संख्या व किंमत याचा ताळेबंद  खालील प्रमाणे मांडता येतो.

विक्रीवस्तूभांडारातील एकूण वस्तू (Total new stock)= विक्रीवस्तूभांडारात आधी असलेल्या वस्तूंची संख्या (Earlier stock) + उत्पादन केलेल्या वस्तूमुळॆ त्यात होणारी वाढ ( new manufactured products) - वस्तूंच्या विक्रीमुळे ( Sold products)त्यात होणारी घट

वरील समीकरण प्रत्येक प्रकारच्या वस्तूसाठी वापरून एकूण वस्तूंचा साठा ठरविला जातो.

विक्रीवस्तूभांडारातील एकूण वस्तूंची किंमत (Total stock value ) = विक्रीवस्तूभांडारात आधी असलेल्या वस्तूंची एकूण किंमत (Earlier stock value) + उत्पादन केलेल्या वस्तूंच्या किमतीप्रमाणे त्यात होणारी वाढ ( Increase in stock value due to new production) - वस्तूंच्या विक्रीमुळे एकूण रकमेत (भांडवल) होणारी घट (Decrease in stock value due to sale of products)

इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये खरेदी केलेल्या वस्तू ( raw items or material), उत्पादन प्रक्रियेत असणार्‍या वस्तू आणि विक्री करावयाच्या वस्तू यांचा एकूण साठा संख्येमध्ये ( stock in numbers) व किंमतीमध्ये ( stock value) किती आहे याचे मूल्यमापन करावे लागते. उत्पादन विनाखंड चालू रहावे यासाठी खरेदी वस्तूंची संख्या, गिर्‍हाईक जाऊ नये यासाठी विक्रीसाठी तयार असणार्‍या वस्तूंची संख्या महत्वाच्या असतात. तर अशा साठ्यामुळे किती भांडवल अडकून पडले आहे कळण्यासाठी या एकूण साठ्याची किंमत काढणे आवश्यक असते.

खरेदी, उत्पादन व विक्री या तीनही विभागातील वस्तूंच्या आदानप्रदानाची नोंद योग्य प्रकारे होण्यासाठी इन्व्हॆटरी व्यवस्थापन करताना विविध प्रकारच्या नोंदपत्रांत (vouchers)  असणारी माहिती संकलित करावी लागते.

खरेदीसाठी खालील नोंद्पत्रांचा उपयोग केला जातो.

खरेदी इरादापत्र( purchase order ), माल पुरवठादाराकडून आलेले खरेदी मालाचे बिल, खरेदीवस्तूभांडारात माल दाखल करताना मटेरिअल इनवर्ड स्लिप, खरेदीवस्तूभांडारातून उत्पादनासाठी माल देताना मटेरिअल  इश्यू नोट, तयार माल विक्रीवस्तूभांडारात  दाखल करताना प्रॉडक्ट इनवर्ड स्लिप, विक्रीवस्तूभांडारातून विक्रीसाठी माल बाहेर पाठविताना प्रॉडक्ट  इश्यू नोट, वस्तू विक्रीसाठी गिर्‍हाईकांकडे पाठविलेली निविदा, विक्री मालाबरोबर पाठविलेले कॅश क्रेडिट बिल (Sales Bill)यांचा या नोंदपत्रांत समावेश होतो.

Tuesday, January 21, 2014

नेट्द्वारे शिक्षणासाठी मुडल सिस्टीम भाग - ३



मुडल शिक्षण प्रणाली पीएचपी (PHP) व मायएसक्यूएल(MySQL) यांचा वापर करून विकसित केली असून  www.moodle.org मुडलच्या अधिकृत संकेतस्थळावरून (official website) डाऊनलोड करून दूरस्थ सर्व्हरवर अगदी सुलभ पद्धतीने स्थापित करता येते. त्याची नोंदणी करणे बंधन कारक नाही. त्यातील सर्व प्रोग्रॅम व डाटाबेसमधील टेबल पाहता व हवे तसे बदलता येत असल्याने आवश्यकतेनुसार फेरबदल करणे वा नवे प्रोग्रॅम त्याला जोडणे शक्य असते. मुडल वेबसाईटचे मुख्य प्रवेशदालन वा फ्रंटपेज आपल्याला हवे तसे डिझाईन करता येते. त्यातून प्रत्यक्ष मुडल व्यवस्थेत  प्रवेश करण्यासाठी प्रवेश नोंदणी ( login registration) करणे आवश्यक असते. 

मुडल शिक्षण प्रणालीत सतत संशोधन होत असून नियमितपणे त्याच्या नव्या सुधारित आवृत्त्या मुडलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होत असतात. सध्या सर्वात नवी आवृत्ती moodle 2.6 असून त्यात अनेक आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अजून बर्‍याच जुन्या ब्राउजरवर ही नवी आवृत्ती चालू शकत नसल्याने ज्ञानदीपने ऑनलाईन कोर्सेससाठी आपल्या सर्व्हरवर moodle1.9 ही प्रणाली स्थापित केली आहे. त्याची लिंक
http://www.dnyandeep.net/webmaster
ही आहे.

मुडलची रचना –
मुडलची रचना एखाद्या शिक्षण संस्थेसारखी असते. शिक्षण संस्थेत व्यवस्थापक ( प्राचार्य वा मुख्याध्यापक), शिक्षक, विद्यार्थी मुख्य घटक असतात व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार  विविध विषयांचे ज्ञान देणे  हे शिक्षण संस्थेचे कार्य असते. मुडलचेही कार्य  असे अभ्यासक्रम शिकविण्याची व्यवस्था करणे हे असते. प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षक नियुक्त करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देणे व शिक्षणसुविधा देणे व सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे याचे  अधिकार   मुडल शिक्षण प्रणालीत व्यवस्थापकास (Administrator) दिलेले असतात. 

मुडलमध्ये प्रवेश घेताना शिक्षक  वा विद्यार्थी असा भेदभाव नसतो. प्रवेश झाल्यावर व्यवस्थापक युजरला त्याच्या इच्छेनुसार विशिष्ट अभ्यासक्रमासाठी शिक्षक वा विद्यार्थ्याचा दर्जा बहाल करतो. हा दर्जा मिळाल्यावर त्या युजरला वेबसाईटवरील फक्त त्याच्याशी संबंधित माहिती व अधिकार यांचा वापर करण्याची सुविधा मिळते. यामुळे माहिती व व्यवस्था सुरक्षित राहते. मुडल शिक्षण प्रणाली असणार्‍या  वेबसाई्टवर सर्वांना (login केलेले नसल्यास) केवळ उपलब्ध अभ्यासक्रम पाहता येतात.


नेट्द्वारे शिक्षणासाठी मुडल सिस्टीम भाग - २



मुडल शिक्षण प्रणालीत मध्ये कृती(activities) व शिक्षणसुविधा(resourses) यांचा वापर अनेकप्रकारे करण्याची सोय असते. चर्चा(Forum), संज्ञाकोश (Glossary), वर्णनात्मक माहिती कक्ष (Wiki), गृहपाठ(Assignments), प्रश्नपत्रिका( Quizzes), मतप्रदर्शन(Poll), स्कॉर्म SCORM ( माहितीची नेटद्वारे सुलभ देवाण घेवाण करण्यासाठी तयार केलेली सुविधा), माहितीसंच (Database) या सर्व गोष्टींचा विषयाच्या आवश्यकतेनुसार  समावेश व क्रम ( sequence) ठरवून  शिक्षणप्रणाली विकसित करता येते तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पूर्वीच्या कृतीवर आधारित पुढील कृती उपलब्ध करून देणे शक्य होते. 

याशिवाय निबंध(blogs), संदेश(messaging) व सहभागी विद्यार्थ्यांची एकमेकात ओळख(participant list), गुणवत्ता यादी(grading), अहवाल(reports) व संयुक्त प्रकल्प( collaborative projects)  याद्वारे  विद्यार्थ्यांचे विषयानुसार कृतीशील गट ( community of learners)  बनवून शिक्षण अधिक प्रभावी करता येते. 
   
मुडल शिक्षण पद्धतीचा पाया खालील मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे.
१.      आपल्या सर्वांना गरजेनुसार शिक्षक वा विद्यार्थी व्हावे लागते.( All of us are potential teachers as well as learners)
२.      एखादी कृती करून वा इतरांना सांगून आपणास अधिक ज्ञान मिळते वा शिकलेले नीट समजते.( We learn particularly well from the act of creating or expressing something for others to see)
व्याख्यान चालू असताना वहीत मुद्दे लिहिल्याने विषय लक्षात राहण्यास साहाय्य होते तसेच विषयातील ज्ञानाचा उपयोग करून काही प्रकल्प केल्यास वा प्रश्न सोडविल्यास शिकलेले नीट समजते.
३.      दुसर्‍यांची कृती पाहूनही आपण बरेच काही शिकू शकतो.(We learn  alot by just observing the activity of our peers)
४.      दुसर्‍यांची मते व स्वभाव जाणून घेतल्याने आपल्या ज्ञानात चांगला बदल घडू शकतो.( By understanding the contexts of others, we can teach or learn more effectively) 
५.      आपल्या गरज व आवडीनुसार शिक्षणाचे वातावरण असल्यास आपल्याला अधिक चांगलॆ समजते. We learn well when the learning environment is flexible and adaptable to suit our needs.)
उदाहरणार्थ एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना आवडेल अशा चित्रांचा व ध्वनीफितींचा वा गमतीदार कोड्यांचा वापर करून व चर्चा घडवून आणून अधिक प्रभावीपणे विषय समजाऊन देऊ शकेल.
  
वरील सर्व सुविधा मुडलमध्ये वापरण्याची सोय असली तरी त्या सर्व वापरल्याच पाहिजेत असे बंधन त्यात नाही. त्यामुळे या सर्व सुविधांचा वापर करण्याचे ज्ञान नसणारा शिक्षकही आपल्या नेहमीच्या पद्धतीने ( म्हणजे माहिती देऊन व प्रश्न विचारून) मुडलद्वारे शिक्षण देऊ शकतो व क्रमाक्रमाने वरील पैकी काही सुविधांचा त्यात समावेश करू शकतो.

Monday, January 20, 2014

नेट्द्वारे शिक्षणासाठी मुडल सिस्टीम भाग - १

माहिती तंत्रज्ञानात झालेले प्रगत संशोधन व इंटरनेटचा सर्व जगभर झालेला विस्तार यामुळे कोणत्याही विषयाचे ज्ञान कोणासही घरबसल्या आता मिळू शकणार आहे. स्थान, वेळ, तज्ज्ञ शिक्षकांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष उपस्थितीची गरज या सर्व अडचणी दूर करणार्‍या  नेटद्वारे  शिक्षण पद्धतीचा अंगिकार भविष्यकाळात सर्वांना करावा लागणार आहे. मात्र सध्याच्या शाळा - कॉलेजात दिल्या जाणार्‍या शिक्षणपद्धतीतील फायदे दूरस्थ पद्धतीत अबाधित राहतील अशी सोय  नेट आधारित शिक्षणात करणे हे मोठे अवघड काम आहे.

सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष  संवाद होऊ शकतो. विद्यार्थी आपल्या शंका शिक्षकांना विचारू शकतो व शिक्षक  विद्यार्थ्याच्या शंका लगेच सोडवू शकतो. सर्व विद्यार्थी एकत्र शिकत असल्याने अशा शंका निरसनाचा इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होत असतो. विद्यर्थ्याची पूर्व तयारी, त्याची मानसिक व बौद्धिक पातळी, त्याच्याकडून होणारा अभ्यास या सर्वांचा विचार करून शिक्षक योग्य ते मार्गदर्शन करू शकतो व त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतो. दूरस्थ पद्धतीमध्ये अशा प्रत्यक्ष  संवादाची सोय मर्यादित असल्याने, विद्यार्थ्यांविषयी पूर्ण माहिती नसल्याने,  तसेच शिक्षण देण्याचे व घेण्याचे कार्य  एकाच वेळी नसल्याने बर्‍याच त्रुटी राहतात. यावर मात करून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वापरावयाची पद्धत विविध पर्यायी सुविधांनी सज्ज असावी लागते.

 सध्या प्रचलित असणार्‍या अनेक दूरस्थ शिक्षण पद्धतीत विषयाचा अभ्यासक्रम व पुस्तके व इतर अभ्यास साहित्य ( पीडीएफ, ध्वनी- चित्रफिती वा सीडी ) पोष्टाने वा इ-मेलने  विद्यार्थ्याकडे पाठविले जाते व नंतर परीक्षा घेऊन विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. काही बाबतीत शिक्षक-विद्यार्थी संपर्कासाठी स्थानिक केंद्रांची योजना केली जाते. या पद्धतीमध्ये अनेक दोष आढळतात.

अशा दूरस्थ शिक्षणात विद्यार्थ्यावर शिकण्याची सर्व जबाबदारी टाकल्याने व अभ्यासाच्या काळात शिक्षकाशी संपर्क नसल्याने शंका व अडचणी सोडविण्यासाठी त्याला शिक्षकाच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून एकत्रपणे शिकण्याचा अनुभव  घेता येत नाही. विषय समजण्यासाठी विद्यार्थ्याने किती कष्ट घेतले, त्याला कोणता भाग समजला नाही त्याला विषयाचे ज्ञान कितपत आत्मसात झाले हे पाहण्यासाठी त्याचे परीक्षेतील यश एवढाच मापदंड वापरला जातो. त्यामुळे विषयात प्राविण्य  मिळविण्यापेक्षा परिक्षेत  यशस्वी होणे एवढेच उद्दीष्ट विद्यार्थ्यापुढे राहते. साहजिकच अशा दूरस्थ पद्धतीचा वापर करून दिले जाणारे शिक्षण प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा फारच कमी दर्जाचे राहते.

  वेबमास्टरचा कोर्स नेटद्वारे देण्याची योजना ज्ञानदीपने आखली त्यावेळी अशा प्रचलित दूरस्थ शिक्षणाऎवजी  प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव देणारी आधुनिक शिक्षण प्रणाली वापरण्याचे निश्चित केले होते.
उपलब्ध दूरस्थ शिक्षण प्रणालींचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की मुडल शिक्षण प्रणाली ही अत्यंत लवचिक, प्रभावी व आवश्यकतेनुसार बदलता येणारी मुक्त स्रोत संगणक प्रणाली आहे व   जगातील अनेक शाळा व महाविद्यालये यांचा यशस्वीपणे वापर करीत आहेत.

मुडल प्रणालीचा अभ्यास करताना एक गोष्ट मनाला भावली ती म्हणजे शिक्षणप्रक्रियेचा मूलभूत विचार घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. मुडल प्रणालीत शिकविणे व शिकणे या दोन्ही क्रियांतील वैयक्तिक ( Personal Constructionism)  तसेच  सामूहिक कृतीशीलतेला (Social Constructionism) मह्त्वाचे स्थान दिले आह्रे.

 पेडॉगॉगी (Pedogogy) म्हणजे लहान मुलांना शिकविण्याची पद्धत व अँड्रागॉगी (Andragogy) म्हणजे प्रौढांना  शिकविण्याची पद्धत या दोन परस्पर भिन्न पद्धतींचा यथायोग्य उपयोग करणे शक्य व्हावे हे उद्दिष्ट ठेवून मुडल प्रणालीची रचना केलेली आहे. पेडॉगॉगी ही शिक्षणाची रूढ पद्धत असून विद्यार्थ्याला नवीन शिकण्यास उद्युक्त करणे, त्याच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन नवी माहिती देणे  याला महत्व दिले जाते. येथे शिक्षकाला महत्वाचे स्थान असून कल्पनाशक्ती व आपला शिकवण्याचा अनुभव याद्वारे तो विद्यार्थ्याला ज्ञान देतो. विद्यार्थ्यांकडून कृती करवून घेतो.  तर प्रौढांना शिकवितांना त्यांची शिकण्याची क्षमता, त्यांचा अनुभव व शिकलेल्या ज्ञानावर आधारित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यांचा विचार करून त्यांना स्वयंशिक्षणासाठी प्रेरित केले जाते. येथे शिक्षकाची जबाबदारी मार्गदर्शनाची रहाते.

शिक्षण देणे व शिक्षण घेणे या गोष्टींची शिक्षक व विद्यार्थी या गटात विभागणी करण्याऎवजी खर्‍या शिक्षण पद्धतीत  शिक्षक व विद्यार्थी एकत्रपणे विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या क्रियेत शिकणे व शिकविणे या दोन्ही भूमिका परस्परांना घ्याव्या लागतात. विद्यार्थ्याने आपल्याला समजलेले आपल्या भाषेत पुनः शिक्षकाला वा इतर विद्यार्थ्यांना सांगणे वा त्यावर आधारित कृती करणे यात अभिप्रेत असते. अशा सामूहिक कृतीस पोषक असे मुक्त चर्चा व्यासपीठ ( फोरम) ठेवणे मुडलमध्ये शक्य असते.

याशिवाय शिक्षक अनेक प्रकारचे अभ्यास साहित्य व मल्टीमिडीया सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतात. विद्यार्थ्यांना समजलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न देणे, परीक्षा घेणे  वा प्रकल्प करवून घेणे शिक्षकास शक्य असते.   

मुडल प्रणालीत सर्व्हरवर सर्व शैक्षणिक सुविधा देणारा डाटाबेस ( माहिती कक्ष ) व त्यावर आधारित  डायनॅमिक वेबसाईट यांचा वापर केला जातो. या पद्धतीत वेबसाईट व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळी  प्रवेश द्वारे असून त्यांना विशिष्ट अधिकार देता येतात.

Saturday, January 18, 2014

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - २



वस्तु खरेदी - निर्मिती उद्योगासाठी लागणारा कच्चा माल वा सुटे भाग यांची संख्या प्रत्येक वस्तूनुसार वेगवेगळी असते. संगणक, टीव्ही, स्कूटर, मोटार या वस्तूंसाठी अनेक सुटे भाग लागतात. हे खरेदी करताना प्रत्येक तयार वस्तूसाठी कोणत्या प्रकारच्या किती सुट्या भागांची वा वस्तूंची गरज आहे व एकूण उत्पादन क्षमता किती आहे याचा विचार करावा लागतो.  यातील काही भाग जास्त किमतीचे तर काही भाग अगदी कमी किमतीचे असू शकतात. 

उदाहरण द्यायचे झाले तर संगणकजोडणीसाठी त्यातील प्रोसेसर वा मेमरीचिप यांची किंमत जास्त असते तर वायर व स्क्रू यांची किंमत अगदी कमी असते. शिवाय त्यांचे मोजमाप करावयाची पद्धतही भिन्न असते. काही वस्तू नगावर, काही वस्तू वजनावर तर काही वस्तू लांबी वा आकारमानावर मोजल्या जातात. नगावर मोजताना देखील डझन, शेकडा यासारखी मापे वापरली जाऊ शकतात. जी गोष्ट मापनाची तीच किंमतीची. कच्चा माल वा सुटे भाग सहसा घाऊक स्वरुपात घेतले जातात त्यावेळी अशा मापन पद्धतीचा विचार करून आवश्यक तेवढ्या मालाची खरेदी करावी लागते.

खरेदी केलेल्या वस्तू साठवून ठेवताना त्यांचे आकारमान, वजन व वस्तुनुरूप योग्य ती संरक्षक सुविधा यांचा विचार करून वस्तुभांडाराची व्यवस्था करावी लागते. 

वस्तूची खरेदी प्रक्रिया खालील टप्प्यात होते.
१.      वस्तू ज्यांच्याकडून विकत मिळतात त्या सर्व पुरवठादारांकडून  कोटेशन मागविणे
२.      या कोटेशन्समधील वस्तूंच्या किमती, कर, गुणवत्ता व इतर अटींचा विचार करून योग्य पुरवठादार निश्चित करणे व त्यास पर्चेस ( खरेदी )ऑर्डर पाठवणे
३.      आलेल्या वस्तू तपासून भांडारात जमा करणे व पुरवठादाराचे बिल रोखीने अदा करणे वा उधारी म्हणून नोंद करणे 

खरेदीमुळे वस्तुभांडारातील वस्तूंच्या संख्येत जशी वाढ होते त्याप्रमाणे वस्तुभांडाराच्या एकूण किमतीत देखील वाढ होते. यातील संख्येची वाढ उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची असते तर किंमतीत होणारी वाढ. ही वस्तुभांडारात गुंतलेल्या भांडवलातील वाढ दर्शविते. 

खरेदीपूर्वी वस्तुभांडारात असणार्‍या वस्तूंची एकूण किंमत + खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत= वस्तुभांडारातील वस्तूंची एकूण नवी किंमत

वस्तूंच्या किंमती कालमानाप्रमाणे व बाजारातील चढ उताराप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे भांडारातील वेगवेगळ्या वेळी खरेदी केलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंची किंमत वेगवेगळी असू शकते. साहजिकच नवीन उत्पादनासाठी वस्तूंचा वापर करताना कोणती किंमत गृहीत धरायची असा प्रश्न पडतो.  याबाबतीत तीन पद्धतींचा वापर करता येतो.

FIFO (पहिल्यांदा खरेदी केलेला माल प्रथम वापरणे)
LIFO(सर्वात शेवटी खरेदी केलेला माल प्रथम वापरणे)
AVERAGE COSTING सर्व वस्तूंच्या एकूण खरेदी रकमेस वस्तूंच्या संख्येने भागून सरासरी किंमत काढणॆ.