Tuesday, January 31, 2012

कागदाची स्प्रिंग व भिरभिरे

१. कागदी दोन पट्ट्या कापून चित्रात दाखविल्याप्रमाणे उलट सुलट घड्या घालून कागदाची छोटी स्प्रिंग बनविता येते.


२. कोलगेट वा अन्य ट्यूबच्या रिकाम्या बॉक्सच्या पट्ट्या कापून अधिक चांगली स्प्रिंग तयार करता येते.

चित्रात दाखविल्याप्रमाणे कापलेल्या पट्ट्या मध्य्भागी दुमडाव्यात. नंतर एका दुमडलेल्या पट्टीच्या दोन्ही बाजूतून दुसर्‍या पट्टीच्या बाजू घालून कोन करावा. या जोडाची एक बाजू बंद असून दुसर्‍या बाजूस दोन पट्ट्य़ा मोकळ्या राहतात. त्यातून तिसर्‍या पट्टीच्या बाजू घालून ही साखळी वाढवावी. अशीच क्रिया पुनःपुन्हा करीत सर्व पट्ट्या जोडून स्प्रिंग तयार करावी ही आता कमी जास्त लांबीची करता येते. या साखळीचा उपयोग करून आणखीही चांगली डिझाईन करता येतील.

कागदाचे भिरभिरे.
केवळ तीन पट्ट्या मध्ये दुमडून व एकमेकीत अडकवून भिरभिरे तयार करता येते. काडीच्या टोकावर ते उभे धरले तर वारा असेल तर ते फिरू लागते. असे भिर्भिरे करून पंख्याखाली धरल्यास सुदर्शन चक्रासारखे ते दिसते.


हेच भिरभिरे उलट धरून उंचावरून खाली टाकले तर फिरत फिरत खाली येते.

Saturday, January 28, 2012

विकल मन आज

सकाळच्या वर्तमानपत्रातील संप मोर्चे, अपघात व पुढार्‍यांचे फॊटो व प्रक्षोभक भाषणे यांचे ठळक मथळे वाचल्यावर मला पेपर पुढे वाचवेना. नेहमीच्या सवय़ीप्रमाणे आजच्या बातम्या पहाण्यासाठी टीव्ही सुरू केला. निवडणुकीचा मोसम सुरू झाल्याने भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, पक्षबदल, दारू, पैसा व बंदुकांचा निवडणूक जिंकण्यासाठी वापर कसा सर्रास वापर होत आहे हे दाखविणार्‍या सनसनाटी बातम्या एवढेच सर्व चॅनेलवर चालू होते. माझे मन उद्विग्न झाले. टीव्ही बंद केला व रेडिओ लावला. रेडिओवर ‘विकल मन आज झुरत असहाय’ अशी नाट्यगीतातील धुन चालू होती. मनात विचार आला की भारतातील लोकशाहीची सध्याची दशा पाहिली की सामान्य जनतेची स्थिती या गाण्यासारखीच झाली आहे.

निवडणुकीच्या अशा हुल्लडीतून लोकांसाठी लोकांनी चालविलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या किती फसवी आहे याची जाणीव झाल्याने विकासाच्या आशेने भविष्याकडे डोळे लावून बसलेल्या जनतेची पूर्ण निराशा झाली आहे. सत्ता व पैसा नेत्यांच्या हाती पडणार पण आपल्या हाती आश्वासनांखेरीज काहीच उरणार नाही याचे आकलन जनतेला होऊ लागले आहे.

या निराशेतून मानसिक संतुलन बिघडणे, अतिरेकी कृत्य, हिंसाचार, आत्महत्या यासारख्या व्यक्तीगत उद्रेकाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गुंडगिरी, दहशत, लुटालूट व दरोडे घालणार्‍या टोळ्या तयार होत आहेत. हे सर्व लोकशाहीला अराजकाचे स्वरूप देत आहेत. यावर उपाय होताना लोकशाहीचे हुकुमशाहीत वा लष्करशाहीत केव्हा रुपांतर होईल हे कळणारही नाही.

देशाचे राहू द्या. अगदी छोट्या गावात किंवा संस्थेत नेत्यांची सत्त्ता हस्तगत करण्यासाठी चाललेली धडपड पाहिली की आपण लोकशाहीसाठी पात्र आहोत की नाही याचीच शंका येऊ लागते. लोकशाहीत लोकप्रतिनिधी ठरविण्यासाठी निवडणूक हा रास्त मार्ग आहे. पण निवडून य़ेण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी, शक्तीप्रदर्शने, पक्षबदल व मतदारांचे विविध मार्गांनी होणारे लांगूल चालन पाहिले की निवडणुकीवरील विश्वासच उडतो.

पक्षाचे तिकीट मिळाले नाही वा मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर उमेदवाराची किती घालमेल होते हे आता सर्वांच्या माहितीचे झाले आहे. आजपर्यंत ज्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो वा नेत्याचा प्रत्येक शब्द झेलत राहिलो व त्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करीत राहिलो त्या पक्षाविषयी एकदम घृणा, द्वेष उफाळून येऊन विरोधी पक्षाविषयी विलक्षण कळवळा निर्माण झाल्याचे वाचून आपल्याला हसावे का रडावे हे समजत नाही. ज्यांच्याबरोबर आयुष्यभर सुखदुःखात सहभागी झालो त्या मित्रांच्या व कुटुंबातील नजिकच्या नातेवाईकांशी वैर पत्करून निवडणुकीसाठी वा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षबदल करणारी माणसे पाहिली की मन उदास होते.

माझ्या लहानपणी मीही निवडणुका पाहिलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, वाजपेयी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, नाथ पै, आचार्य अत्रे अशी दिग्गज मंडळी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत. त्यावेळी होणारी नेत्यांची भाषणे म्हणजे वैचारिक ज्ञानाचा मोठा खजिना असे. कोणत्याही पक्षाचा प्रचार असो. नेत्यांचे भाषण म्हणजे आपल्या विचारांना एक नवे खाद्य मिळत असे. कवी व लेखकही आपापल्या साहित्यिक कलेचा अनोखा नमुना सादर करून प्रचारात रंगत आणत. कॉंगेस पक्षाच्या प्रचारासाठी कवी. ग. दि. माडगुळकरांचे गीत त्याच्या प्रासादिकतेमुळे फार प्रसिद्ध झाले होते. इतर पक्षही देशभक्तीची गाणी व शिवरायांच्या पराक्रमाची गीते आपल्या प्रचारात वापरत असत. वर्तमानपत्रे विशिष्ट विचारसरणी्शी बांधलेली असायची व त्यात चांगले अभ्यासपूर्ण लेख असत.

तो काळ आता विस्मृतीच्या पडद्याआड गेला आहे. आता निवडणूक हा वैयक्तिक स्वार्थावर आधारित राजकारणाचा हमरीतुमरीचा खेळ बनला आहे. विचारांची बांधिलकी व पक्षनिष्ठा यांना काहीही महत्व उरलेले नाही. अशा निवडणुकीत यशस्वी होणारे नेते स्वतःला लोकप्रिय लोकप्रतिनिधी खुशाल समजोत. जनतेला त्यांचे खरे स्वरूप समजले आहे.

जनतेचे मन विकल होऊन ती असहाय बनली आहे. निवडणुकांचे सध्याचे बाजारी स्वरूप बदलले तरच खर्‍या सशक्त लोकशाहीची स्थापना होऊ शकेल व जनतेची विकासाची व समृद्धीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील.

चोवीस तास पाणीपुरवठा

किती सुखद कल्पना आहे? नळाला पाणी केव्हा येते याची वाट पहात पाणी आले की वेळी अवेळी हातातली इतर सर्व कामे सोडून पाणी भरायची उसाभर करायला नको. सार्वजनिक नळावर भांड्यांची रांग लावून नंबर लावायला नको पाण्यासाठी भांडणे नकोत. जेव्हा लागेल तेव्हा नळाला पाणी येत असेल तर घरात पाण्याचा साठाही करायला लागणार नाही. खरेच नळाला असा चोवीस तास पाणीपुरवठा झाला तर..

आता ही केवळ कविकल्पना राहिलेली नाही. शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजना हाती घ्यायचे ठरविले आहे. या कार्यात महाराष्ट्र राज्यातील पाणीपुरवठा मंडळातील माजी मुख्य अभियंता व सदस्य सचिव डॉ. संजय दहासहस्र यांनी अशा योजना प्रत्येक शहरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून 24x7water.com या नावाचे संकेतस्थळही सुरू केले आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत अनेक फायदे आहेत.
१. सध्याच्या ठराविक वेळ पाणी पुरविण्याच्या पद्धतीत दिवसातला बराच काळ नळ रिकामे रहातात व त्यात व्हाल्व्ह वा इतर गळतीच्या ठिकाणी बाहेरील माती, कचरा व सांडपाणी नळात शिरते. परिणामी पुरवले जाणारे पाणी दूषित होऊ शकते. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील नळांमध्ये कायम दाबयुक्त पाणी असल्याने बाहेरील सांडपाणी आत शिरण्याचा व पाणी दूषित होण्याचा धोका टळतो.
२. नव्या योजनेत पाणीपुरवठा चोवीस तासात विभागला गेल्याने नळांचा व्यास सध्याच्या पद्धतीशी तुलना करता बराच कमी लागतो.
३. बूस्टर पंप कमी क्षमतेचे चालतात. त्यामुळे विजेच्या बिलातही लक्षणिय घट होते.
४. विभागवार मोठ्या साठवण टाक्या बांधण्याची आवश्यकता नसते.
५. प्रत्येक घराच्या छतावर पाणी साठविण्याची टाकी बांधण्याचा खर्च वाचतो.
म्हणजे ही बहुगुणी योजना करणे शासनाच्या व ग्राहकाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मात्र याच्या यशस्वी संचालनासाठी खालील गोष्टीची काळाजी घ्यावी लागेल.
१. जर सध्याची नळाव्यवस्था नव्या योजनेसाठी वापरावयाची असेल तर त्यातील जुने वा गळके पाईप बदलून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यवयास हवी.
२. पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचे काटेकोर मापन करणे आवश्यक आहे. यासाठी वाटरमीटर बसविणे सर्वांना सक्तीचे करावे लागेल.
३. सध्या बर्‍याच ठिकाणी घरातील बागबगिच्यासाठी वा स्वच्छतेसाठी नळाच्या पाण्याचा मुक्तपणे वापर केला जातो. हे पाणी पिण्यायोग्य दर्जापर्यंत शुद्ध केलेले असते याची जाणीव असा वापर करणार्‍याला नसते. चोवीस तास पाणीपुरवठ्यामध्ये अशा प्रकारे पाणी वापरल्यास बरेच पाणी वाया जाण्याची शक्यता असते. यासाठी लोकांना पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करण्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. वापरताना सांडपाणी शुद्ध करून वा बोअर वेलचे(विंधन विहीर) पाणी वापरावयास हवे. पर्जन्य जल संकलन केल्यास भूजल पातळी वाढून पाण्याची गरज बर्‍याच प्रमाणात भागू शकेल.
४. आधुनिक संवेदन उपकरणांचा वापर असलेल्या आपोआप उघड्मीट करणार्‍या नळाच्या तोट्या वापरल्यास पाणी वापरात बचत होऊ शकते.
जुन्या नळव्यवस्थेचे रुपांतर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत करणे मात्र तितके सोपे व फायदेशीर ठरणार नाही मात्र नव्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी चोवीस तास पाणीपुरवठा ही आदर्श पद्धत आहे. कारण यात खर्च कमी व पाण्याचा वापर व वीजखर्चही कमी असणार आहे. तसेच दाट लोकवस्तीच्या शहरी भागात चोवीस तास पाणीपुरवठा करणे प्रभावी व फायदेशीर ठरेल यात शंका नाही.

Thursday, January 26, 2012

हलव्याचा डबा

जपान देशात विकसित झालेली कागदाच्या विविध वस्तू, पक्षी, प्राणी यांच्या प्रतिकृती करण्याची कला ‘ओरिगामी’ आता सर्व जगात प्रसिद्ध झाली आहे. त्याची सविस्तर माहिती देणारी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. इंदुताई टिळक यांची या विषयावर पाच पुस्तके लिहिली आहेत.

आमच्या लहानपणी आम्हाला याची काही माहिती नव्हती मात्र कागदाच्या होडी, बंबी बोट, फोटोफ्रेम, विमान, सुदर्शन चक्र व पतंग करण्याचे ज्ञान घरातील वडिलधार्‍या मंडळींना असायचे व त्यांच्या मदतीने अशा वस्तू करण्यात आम्ही रंगून जात असू. त्यात हलव्याचा डबा करणे हे मोठे कौशल्याचे काम असे. डिंक न वापरता केवळ घड्या घालून व कात्रीने आवश्यक तेथे कापून आकर्षक हलव्याचा डबा करता येतो. रंगीत कागद वापरून वा रंगाच्या ब्रशने नक्षी काढल्यास अशा डब्याचे सौंदर्य अधिकच वाढू शकते.

बालगोपाळांच्या माहितीसाठी असा हलव्याचा डबा कसा करायचा याची माहिती खाली देत आहे.
१. प्रथम एक चौरस आकाराचा (लांबी व रुंदी सारखी असलेला) कागद कापून घ्यावा.
२. विरुद्ध बाजूची टोके जोडतील अशा घड्या पाडाव्यात. (चित्र १ पहा)

३. एक टोक कागदाच्या मध्यावर आणून घडी घालावी व त्याच घडीची बाजू मध्यावर आणून दुसरी घडी घालावी. अशीच कृती सर्व टोकांसाठी करावी.(चित्र २ पहा)

४. एका टोकाच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाजू कापून कानासारखे सुटे भाग तर विरुद्ध टोकाजवळ आडवी फट तयार करावी.
५. चित्रात दाखविल्याप्रमाणे कागद दुमडून डब्याचा आकार देणे सुलभ व्हावे यासाठी प्रत्येक कोपरा छेद करून मोकळा करावा.
६. आता कानाचा कोपरा दुमडून समोरच्या टोका जवळच्या फटीतून आत घालून चित्रात दाखविल्याप्रमाणे उघडावा म्हणजे दोन्ही कोपरे जुळून येऊन डब्याच्या दोन बाजू तयार होतील.


७. तीच क्रिया राहिलेल्या कोपर्‍यांसाठी करून डबा तयार करावा.

८. डब्याच्या चारही कोपर्‍यात तयार झालेले नवीन कानांच्या आकाराचे भाग उघडून ते नक्षीदार करावेत.
९. डबा हातात धरण्यासाठी कागदाचीच नक्षीदार पट्टी करावी व ती डब्याच्या मध्यावरील फटीत पूर्वीच्याच पद्धतीने अडकवण्याची सोय करावी.

१०. तयार झालेल्या डब्यात चारही बाजूंनी हलवा आत टाकता येतो व त्यातून बाहेरही काढता येतो. शिवाय इतरवेळी डब्याची तोंडे बंदच राहतात.
११. असा डबा आपणही तयार करा व पुढच्या संक्रांतीला त्यातूनच हलवा वाटा.

Wednesday, January 25, 2012

समन्वय

परवा संक्रांतीच्या दिवशी मी ‘मतभेदाकडून सुसंवादाकडे’ या नावाचा लेख लिहिला होता. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अनेक अशी उदाहरणे होती की जेथे व्यक्ती व संस्था यांच्यातील मतभेद पराकोटीचे ताणले गेल्याने दोन्ही पक्षांना समन्वय करणे अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. दोन विरुद्ध टोकांचे विचार असणारे पक्ष एकत्र येणे कसे शक्य आहे या जाणिवेने मलाही माझ्या लेखातील सूचनांबद्दल संदेह निर्माण झाला होता.

या संदेहाची सोडणवूक करण्याचा मार्ग एका छोट्या प्रसंगातून अनपेक्षितपणे माझ्या ध्यानात आला. माझ्या नातीला कागदाची होडी कशी करायची हे मी शिकवीत होतो. एक चौकोनी कागद घेऊन त्याची घडी कशी घालायची हे मी तिला दाखविले व हे दाखवत असताना माझ्या विचारचक्राला गती मिळाली.



चौकोनी कागदाच्या दोन विरुद्ध टोकांना एकत्र करण्यासाठी या दोन्ही टोकांपासून सारख्याच अंतरावर असणार्‍या टोकांचा उपयोग करून घडी घालावी लागते. या घडीवरील सर्व बिंदू दोन विरुद्ध टोकांच्यापासून सारख्याच अंतरावर असतात. म्हणजे दोन्ही बाजूंना मान्य असणारा एक समान पाया घडीच्या रुपाने तयार होतो. ही घडी दाबून घट्ट केली की दोन विरुद्ध टॊके एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होतो. घडीपासून सावकाश व सावधानतेने दोन्ही बाजू मिळवत टोकांकडे जावे लागते. अन्यथा ती टोके एकमेकापासून पुन्हा दूर होऊ शकतात. आता हीच पद्धत दोन विरुद्ध गटात समन्वय करण्यास वापरता येईल.

दोन्ही गटांबद्दल सारखीच सहानुभूती व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल विश्वास असणार्‍या व्यक्तींनी आपली एकजूट केली तर दोन विरुद्ध टोके एकत्र येणे शक्य होईल. अशी टोके एकत्र येण्याचा फायदा म्हणजे टोकाचे विचार असणार्‍या लोकांना आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करणे भाग पडेल व आपल्या मतांना प्रसंगी मुरड घालावी लागेल व निर्विरोध प्रगतीसाठी आवश्यक ते बळ लाभेल.

रशिया व अमेरिका या दोन विरुद्ध बलाढ्य राष्ट्रांच्या लढाईमुळॆ विश्वयुद्धाची शक्यता टाळण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी पुढाकार घेऊन अलिप्त राष्ट्रांची तिसरी आघाडी केली व त्याद्वारे या दोन्ही विरुद्ध गटांना शांततेसाठी एकत्र येण्यास भाग पाडले व विश्वशांतीचा मार्ग सुकर केला.

कागदाच्या घडीने मला समन्वयाचा नैसर्गिक नियम उमजला. यावर पुढे विचार करता असे लक्षात आले की संक्रांतीचा हलवा ठेवण्यासाठी कागदाचा जो डबा आम्ही लहानपणी तयार करायचो त्यात तर कागदाची सर्व टोके एकत्र आणून व एकमेकात गुंतवावी लागायची. मगच अशा डब्यात समन्वयाचा संदेश देणारा गोड हलवा ठेवता यायचा.

सध्या एकाच समान अंतिम ध्येयाकडे पण विरुद्ध दिशांनी एकमेकांशी झगडत कार्य करणार्‍या गटांनी यापासून काही बोध घॆण्यास हरकत नाही.

Monday, January 23, 2012

हँडरायटिंग डे

दै. लोकमत २३-१-२०१२
नवी दिल्ली - हस्ताक्षरावरून व्यक्तीची प्रवृत्ती, त्याची जीवनशैली कळण्यास मदत होऊ शकते. मानसिक समस्याही कळू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणने आहे. आज दि. २३ जानेवारी रोजी ‘हँडरायटिंग डे’ आहे. आजच्या संगणक युगात आणि ई-मेलच्या जमान्यात हाताने पत्र लिहणे, अर्ज लिहणे हे प्रकार कमी झाले आहेत. मात्र हस्तांक्षरांवरुन व्यक्तीमत्वाची ओळख पटविण्याचे महत्व कायमच असल्याचे अनेक हस्ताक्षरतज्ज्ञांचे विशेषज्ञ व्ही. सी. मिश्रा म्हणाले, हँडरायटिंगला खरे तर ‘ब्रेन रायटिंग’ म्हटले जाते.
आपला व्यवहार, आपले वर्तन, आपली विचारप्रणाली आपल्या हस्ताक्षरांमधून झळकते. वयाच्या १२ वा १५ वर्षांपर्यंत मुले-मुली आपले पालक वा शिक्षक मंडळी सांगतील त्याप्रमाणे लिहण्याचा प्रयत्न करतात. नंतर त्यांची स्वत:ची शैली विकसित व्हायला सुरुवात होते. ही बाब मुला-मुलींच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. सदर प्रक्रिया वयाच्या १८ ते २४ वर्षांपर्यंत पूर्ण होतात. हस्ताक्षरांच्या दुनियेतील तज्ज्ञ मानसी म्हणाल्या, कुठल्याही व्यक्तीच्या हस्ताक्षरावरुन अनेक मानसिक समस्यांचा शोधही लावता येतो. व्यक्ती मानसिक तणावाखाली असल्यास त्याचेही संकेत मिळू शकतात. अनेक कंपन्या उमेदवारांचे हस्ताक्षर बघून त्यांची निवड करतात.
----

आपले हस्ताक्षर ही आपली स्वतःची ओळख आहे. त्याचा उपयोग करून आठवणींवर स्वतःची मोहोर उठवा व त्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करा.
सुरेश रानडे

Monday, January 16, 2012

रानडे यांचे राष्ट्रवादी अर्थशास्त्र

महादेव गोविंद रानडे यांची न्यायमूर्ती म्हणून मर्यादित ओळख आपल्याला शालेय जीवनापासून करण्यात आपली यंत्रणा यशस्वी ठरली आहे. ते एक महान समाजसुधारक, राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक, स्वतंत्र भारताचे द्रष्टे तर होतेच पण अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते. भारतामध्ये समाज सुधारणेबरोबर आर्थिक सुधारणा होणे क्रमप्राप्त आहे, यादृष्टीने त्यांनी आपले आर्थिक विचार प्रकट केलेले आहेत ते वाचा.
रानडे यांचे राष्ट्रवादी अर्थशास्त्र

Friday, January 13, 2012

FINIX - Translation of Marathi poem

Four suicide attacks of terrorists on Twin Towers of World Trade Center and other buildings on Sept. 11, 2001 gave a shock to the entire world. Those towers collapsed within 2 hours like sudden falling of giant tree. This incidence gave inspiration to my wife, Sou. Shubhangi to compose a nice metaphorical Marathi Poem “Finix” which was written on the following day. She imagined the incidence as an attack of ferocious vultures on a tall tree. She expressed her wish that a Finix bird with take birth through the ashes of destruction and will punish the culprits on some day.

As that chapter is finally closed, I take opportunity to translate the poem in English for non-Marathi readers. Please forgive me for any drawbacks from poetic quality of translation.

You are welcome to suggest changes in words and phrases.

FINIX

There stood a big tall tree
amidst a group of trees

As if it was the base pillar
supporting the earth floor

Its roots had gone deep in the ground
and had spread far and wide

There were innumerable leaves
And lot many fruits and flowers

It had a broad base platform
like a glamor of a king in the forest

Many birds flocked to the tree everyday
Some of them stayed as well there for rest.

Their cluttering noises filled and sounded
through the branches of the tree.

There was no discord between any of them
And together they lived happily there

But the day was born
Bringing an unknown future for the birds.

Soft wind was blowing in the pleasant morning
The tall tree was swaying slowly with it

It forgot the threat it received
Which had come in the past

Every thing shuddered in a moment
No body could follow what had happened

One big vulture came flying straight
And dashed against the tree tearing it apart

It had an enormous force
And poisonous stings

The tree collapsed down to the ground
crushing many birds under its branches

Dust rose to the skies
Spreading the news in the world like light

Those vultures two to four in number
Did similar destruction here and there

World will never forgive these vultures
And one day or other shall punish them sure

Let the time pass for a while
Even if the tree has turned into ashes

Finix bird will take birth from the same ash
And it will destroy such vultures
Still hovering anywhere in the world.

The world will be freed from such threats
forever by that mighty Finix bird.

संक्रमण - मतभेदाकडून सुसंवादाकडे

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना । असे संस्कृत वचन आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तसे त्याचे विचारही वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यात मतभेद होणे यात काहीच गैर नाही. तरी वैचारिक मतभेदांना वैयक्तिक शत्रुत्वाचे स्वरूप देणे चुकीचे आहे. विचार आपल्याशी जुळत नसतील वा आपल्या विचारांच्या अगदी उलट टोकाचे असतील तरी चर्चेचे दार कधी बंद करू नये. एकमेकांबद्दल आदर ठेवून केलेल्या चर्चेने मतपरिवर्तन वा मतैक्य होण्याची शक्यता असते त्यामुळे परस्पर संपर्काची संधी घेऊन सुसंवाद निर्माण करणे दोन्ही बाजूंच्या हिताचे ठरते.

यासाठी गरज आहे ती व्यक्तिगत टीका टाळण्याची. कारण एका बाजूने व्यक्तिगत टीका सुरू झाली की दुसर्‍या बाजूकडूनही अशी टीका सुरू होते. मग या टीकांना प्रत्युत्तर देण्याच्या चढाओढीत वादाचा मूळ मुद्दा बाजूला पडतो व वितुष्ट वाढत जाते. वितुष्ट वाढले की परस्परातील दरी रुंदावते. मने दुखावतात वा दुभंगतात. प्रत्येक गोष्टीचा विचार मग ती आपल्या का विरुद्ध पार्टीची यावर त्याचे मूल्यमापन केले जाते. कोणा बाहेरच्या व्यक्ती वा गटाशी संपर्क आला तर त्याची बांधिलकी कोणत्या गटाशी आहे याचा विचार आधी केला जातो. परिणामी सुसंवादच काय पण एकत्र येणेही टाळण्याची प्रवृत्ती वाढत जाते. अविश्वास व संशयाचे वातावरण निर्माण होते. त्यातूनच पुढे मुद्यांचे रुपांतर युद्धात होऊ शकते.

परस्पर संवाद हा माणसाचा स्थायी भाव आहे. हा संवाद सुसंवाद असेल तर आनंददायी ठरतो. समूह भावना वाढीस लागते. एकत्रित कार्यशक्ती मोठी ध्येये साध्य करण्यास सक्षम ठरते. लोकांना परस्परांशी बोलणे आवडते. जास्त ओळखी असणे हा मोठा गुण मानला जातॊ. आपल्या विचारांचा व कृतीचा प्रभाव इतरांवर पडावा असे प्रत्येकाला वाटत असते. आपले मुद्दे एकमेकांना पटवून द्यायची त्यांची इच्छा असते. मात्र दुसर्‍यांच्या मतांचा विचार न करता आपले मतच खरे आहे असा हट्ट धरणे योग्य नाही. याउलट दुसर्‍याच्या विचारांतील व पूर्वगृहातील त्रुटी शोधून त्याची चूक त्याला दाखवून दिल्यास त्याचे मतपरिवर्तन होऊ शकते. मात्र वैयक्तिक आकसातून वाटागाठींचे दरवाजे बंद करून टाकल्यास संघर्षास दोन्ही बाजूस मान्य होईल असा पर्याय निर्माण करण्याचा मार्गच खुंटतो.

मला आठवते, वालचंद कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये रहात असताना मी तेथील सोशल क्लबचा कार्यवाह होतो. त्यावेळी ‘संवाद’ नावाचे हस्तलिखित मी सुरू केले होते. सदस्यांनी त्यात आपले लेख, चित्रे, कविता द्याव्यात व ते हस्तलिखित सर्वांकडे पाळीपाळीने पाठ्वायचे अशी ती योजना होती. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. पुढे माझ्याकडूनच या उपक्रमात थोडी चालढकल झाली व लिखित संवाद बंद पडला. कॉलेजमध्ये व सांगलीतील नगरवाचनालयामध्येही आम्ही असे वादविवाद मंडळ चालविले होते त्यावेळी अनेक नव्या विचारांची मला ओळख झाली. माझ्या विचारांतही त्यामुळे खूप चांगले फेरबदल झाले. त्याकाळचे ते वातावरण आता इतिहासजमा झाले आहे.

राजकारणात, संस्थात व विविध धार्मिक गटात आज सुसंवादाची जागा संघर्षाने घेतलेली आपण पहातो. मात्र याबाबतीत मला आपल्या राजकीय नेत्यांचे कौतुक करावेसे वाटते. एखद्या समारंभाच्या निमित्ताने दोन विरुद्ध पार्टीचे नेते एकत्र आले की दोन जिवाभावाचे मित्र भेटतील असे ते वागतात. एकमेकांची स्तुती करतात. त्यांचे कुशल विचारतात. कारण त्यांना माहीत असते की भविष्यात त्यांना आपल्याकडे किंवा आपणास त्यांचेकडे जावे लागेल. शिवाय सर्व सामान्य जनतेपुढे आपले साधे सोज्वळ स्वरूप दाखविण्याची त्यामागे धडपड असते आणि त्यात बिघडले ते काय? नव्हे त्यांनी तसेच बाहेरही व आपल्या अनुयायांच्या समोर बोलावे. म्हणजे अनुयायांच्यातील परस्पर द्वेष कमी होईल व सामंजस्याच्या वातावरणात विचारांचे खंडन मंडन होऊ शकेल. प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेन याने म्हटले होते की हिटलर व विस्टन चर्चिल यांना एकत्र एका खोलीत ठेवले असते तर चर्चेने प्रश्न सुटून महायुद्ध टाळता आले असते.

`We agree to disagree.' आमचे विचार एकमेकांना पटत नाहीत याबद्दल आम्हा दोघांचे एकमत आहे. परस्परांचे विचार समजून घॆण्याची प्रक्रिया यात अंतर्भूत आहे. हल्ली काय होते. दोन पक्ष एकमेकांपासून विरुद्ध दिशेला तोंडे फिरवून एकमेकांवर टीका करीत असतात. त्यामुळे वादाला वितंडवादाचे स्वरूप येते. एकमेकांना न भेटता त्रयस्थ वकिलांमार्फत न्यायालयात आरोप प्रत्यारोप केले जातात. दुसर्‍या बाजूचा नि्ष्पक्षपातीपणे विचार न करता आपली बाजूच खरी आहे या ईर्षेने खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जात असे खटले वर्षानुवर्षे ताटकळत पडतात. यात पैसा व वेळ जातोच पण ज्या वादासाठी आपण भांडतो त्या वादाचे मूळच नाहिसे होण्याची वा बदलण्याची शक्यता असते.

यासाठी ‘ वादे वादे जायते तत्वबोधः ।’ या वचनावर श्रद्धा ठेवून व परस्परांबद्दल कोणतीही वैयक्तिक कटुतेची भावना न ठेवता मतभेदाकडून सुसंवादाकडे वाटचाल करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. असे झाले तर व्यक्ती, गट, प्रांत, जाती, देश यातील अनेक वाद मिटतील. सलोख्याचे, सौहार्दाचे व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. अखिल मानवजातीच्या सुखसमृद्धीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

यंदाच्या मकरसंक्रांतीतील संक्रमणाचा अर्थ ‘मतभेदाकडून सुसंवादाकडे संक्रमण’ असा आपण घॆऊया.

Tuesday, January 10, 2012

त्यांना बोलते करा.

मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही हे एका दृष्टीने बरेच आहे. कारण त्यांना बोलता आले असते तर आपण माणसे त्या प्राण्यांपेक्षाही किती खालच्या दर्जाचे आहोत हे त्यांनी आपल्याला तोंडावर सुनावले असते. मोठ्या प्राण्यांच्या बाबतीत त्याचे दुःख आपल्याला समजू शकते. बैलांवर मारले जाणारे चाबकाचे फटकारे, सायकलीला उलट्या बांधून विक्रीस आणलेल्या कोंबड्या, पाय बांधून नेली जाणारी डुकरे, कसायाच्या तावडीत सापडलेली गुरे, पाण्याबाहेर काढल्यावर तडफडणारे मासे हे पाहिले की कोणाही संवेदनशील माणसाचे मन हळहळते. साप, उंदीर, बेडूक या प्राण्यांचे दुःख आपल्याला फारसे जाणवत नाही. किडा, मुंगी यासारख्या लहान कीटक यांच्याबाबतीत त्याना दुःख होत असेल की नाही याचा आपण विचारच करीत नाही. झाडांना संवेदना नसतातच. अशी आपली खात्रीच असते.

पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या संवेदनांची माणसाला जाणीव करून देण्याची गरज भासू लागली. मग त्यांच्या अन्नपाण्याच्या गरजांविषयी माणूस गांभीर्याने विचार करू लागला. त्यांचे संरक्षण व संवर्धन माणसाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने आवश्यक आहे हे समजल्याने त्यांच्याबद्दलचा बघण्याचा माणसाचा दृष्टीकोन आता बराच बदललेला आहे. या बदललेल्या दृष्टीकोनाचा परिणाम म्हणून वन, वन्यप्राणी व जैवविविधता संरक्षण कायदे अस्तित्वात आले. अभयारण्ये व वृक्षारोपणासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र हे सर्व करत असताना त्यांच्या संवेदनक्षमतेचा विचार न होता माणसाच्या भवितव्याविषयी वाटणारी काळजी ही मुख्य प्रेरणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रखर संवेदनशीलता ही माणसाला मिळालेली एक अप्रतिम देणगी आहे. कवी, साहित्यिक वा कलाकार यांना निसर्गातील प्रत्येक गोष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कार होतो. त्यातून त्यांची प्रतिभा व नंतर कलाकृती निर्माण होते. शास्त्रज्ञाला निसर्गातील कार्य कारण भावाचा शोध घ्यावयाचा असल्याने त्याचेही मन तसेच संवेदनशील असावे लागते तरच आपल्या बुद्धीचा वापर करून त्या माहितीचा मानवाच्या कल्याणासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शोध घेण्याचे कार्य तो करू शकतो.

निर्जीव पदार्थांना संवेदना नसते. मात्र उपयुक्त निर्जीव पदार्थ व वस्तूंना विज्ञानाच्या साहाय्याने आपण संवेदनशील बनवू शकतो. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग करून तिजोरीची राखण करण्यासाठी वा परिसरावर नजर ठेवण्यासाठी निर्जीव यंत्रणेला नवी दृष्टी आपण देऊ शकतो. संवेदनशील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून यांत्रिक मानवास कान, नाक, डोळे यासारखी पर्यायी संवेदन इंद्रिये आपण त्याला लावू शकतो. यांचाच उपयोग करून आपन मुक्या प्राण्यांना बोलते करू शकू. झाडांना बोलते करू शको. मग ‘मला पाणी पाहिजे’ असे झाड ओरडून सांगू शकेल’. प्राण्यांचे दुःख आपल्या बधीर झालेल्या कानांना ऎकू येऊ शकेल. वंगण नसलेले यंत्र वा गंजलेल्या बिजागिरी असणारे दार असे कुरकुर आवाज करीत आपले लक्ष वेधते त्याप्रमाणे प्रत्येक वस्तु आपल्या तब्बेतीची तक्रार बोलून दाखवू शकेल.

हीच कल्पना पुढे नेली तर खड्डे पडलेले रस्ते, तुंबलेले गटार, गळणारे नळ, तुटलेले रूळ, विजेच्या लोंबकळणार्‍या तारा नगरसेवकाची वा मोर्चांची वाट न पाहता आपले गार्‍हाणे थेट योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवू शकतील. अर्थात या सर्वांना दर वेळी अत्याधुनिक उपकरणांची गरज लागेलच असे नाही. माहिती संकलन व्यवस्था सर्वसमावेशक केली व त्याच्या विष्लेषणाचा योग्य उपयोग केला तर अशा अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतील.

उदाहरणच द्यायचे झाले तर शहरातील प्रत्येक रस्त्याची माहिती म्हणजे तो तयार केव्हा केला, दुरुस्ती केव्हा केली, ट्रॅफिक किती आहे, अपघात किती झाले यांच्या माहितीचा आढावा घेतल्यास रस्त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. हा अंदाज इशारा स्वरुपात संगणकावर दिसू शकण्याची योजना करता येईल म्हणजे रस्ता धोकादायक बनला आहे व तो लगेच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे हे त्या रस्त्याची माहितीच आपल्याला सांगू शकेल. मग लोकांच्या तक्रारीची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करता येईल.

सध्या अशा निर्जीव सेवासुविधांविषयीच्या तक्रार लोक व नगरसेवक संबंधित खात्याकडे करतात. यात जो तक्रार करील वा ज्या नगरसेवकाचा दरारा मोठा त्याच रस्त्याचे भाग्य उजळते. आवश्यकता नसली तरी अशा रस्त्यांचे नूतनीकरण होते. इतर रस्त्यांची स्थिती अगदी खालावलेली असली तरी प्रभावी तक्रारीअभावी त्यांची कोणी दखल घेत नाही. परिणामी एखादा मोठा अपघात सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधतो. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. घडायचे ते घडून गेलेले असते.

जी गोष्ट रस्त्याची तीच प्रत्येक सुविधेची, प्रदूषणाची, धोकादायक परिस्थितीची. या सर्वांना आधुनिक उपरणांच्या व सर्वंकष माहिती व्यवस्थापनाच्या आधारे बोलते केले तर अपघात टळतील, प्रदूषण वाढणार नाही व शहरातील सर्व सेवासुविधा विनातक्रार काम करतील. सर्वांचा विकास लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय केवळ गरज व गुणवत्ता यांच्या आधारे करणे शक्य होईल.

Tuesday, January 3, 2012

संगणक प्रशिक्षण - सरकारी खाक्या

दोनच दिवसांपूर्वी ‘ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून शाळा कॉलेजात मोफत संगणक शिक्षण सुविधा देण्याची कल्पना मी मांडली होती. आज (३-१-२०१२) सकाळमध्ये महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली इ-टेंडर पद्धतीने राज्यातील ५००० शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याविषयी अर्ज करण्याची जाहिरात वाचली. ती पाहिल्यानंतर अशा शैक्षणिक कामात शिक्षकांना सहभागी न करून घेता सर्व कामाचे कंत्राट एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीला ( वा तिच्याशी संगनमत असणार्‍या नामधारी स्वदेशी कंपनीला) कसे मिळेल याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून आले. टेंडरच्या अटी पाहिल्या की कोणतीही भारतीय कंपनी यात टेंडर भरू शकणार नाही हे सहज लक्षात येईल.
पहिली अट - सर्व काम BOOT पद्धतीने म्हणजे स्वतःचा पैसा खर्च करून करायचे व ते पैसे नंतर सेवाशुल्कातून वसूल करायचे.
दुसरी अट - टेंडर भरणार्‍या कंपनीची वा्र्षिक आर्थिक उलाढाल कमीतममी ४५ कोटी रुपये असावी ( ४५ हा आकडा डॉलर विनिमय दराशी मिळताजुळता आहे.)
तिसरी अट - गेल्या तीन वर्षांत कंपनीने कमीत कमी ६०० शिक्षक प्रशिक्षण वर्ग घेतलेले असावेत.
टेंडरअर्जाची किंमत - ५०००० रुपये
बयाणा अनामत रक्कम - एक कोटी रुपये
साहजिकच वरील अटी मायक्रोसॉफ्ट, याहू सारख्या कंपन्या वा त्यांच्या भागीदार संस्थाच पुर्‍या करू शकतात.
दिले जाणारे शिक्षणही त्यांचाच व्यवसाय पुढे वाढविण्यास व त्यांची उत्पादने विकण्यास त्याना उपयुक्त ठरणार.
उपलब्ध मुक्त शिक्षण स्रोतांचे (open source) शिक्षण यात विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाची ही योजना सर्व शाळांवर बंधनकारक राहणार असल्याने आता ज्या शाळांमध्ये स्थानिक संगणक शिक्षकांच्यावा संगणक शिक्षण संस्थांच्या मदतीने कार्य चालू आहे ते बंद पडणार. याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यात होणार.
कदाचित हे शिक्षक व संस्था टेंडर मिळालेल्या कंपनीत काम मिळवू शकतीलही मात्र त्यांची अवस्था कोडमंकीसारखी ( माझा या नावाचा लेख वाचा) होईल
यावर कोणीच आवाज उठविणार नाही का?

Sunday, January 1, 2012

ज्ञानदीप मंडळ

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ’ज्ञानदीप मंडळ’ सुरू करण्याचा संकल्प ज्ञानदीप नववर्षानिमित्त करीत आहे. या योजनेत शाळेतील संगणकाचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संगणकावर मराठी टाईप करणे, माहितीचा शोध घेणे, इ मेल व ब्लॉग सुरू करणे इत्यादी माहिती ज्ञानदीपतर्फे देण्यात येईल. विविध विषयांवर असणार्‍या शैक्षणिक ध्वनी चित्रफितींची माहिती देण्यात येईल.

शिक्षण प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरून आपणास हे ज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफिती व चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांना माहिती असते.

आज माहितीचा हा साठा मुख्यत्वे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे त्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व विषयाच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप मंडळात सहभागी होता यॆईल. मात्र विज्ञान शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व अधिक माहिती असल्याने त्यांनी या उपक्रमात पुढाकार घेतल्यास ज्ञानदीप मंडळाचे कार्य यशस्वी होऊ शकेल. ज्ञानदीप फौंडेशन आपणास याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल.

भोवतालच्या समाजातील विविध समस्यांचा शोध घेणॆ व त्यावर प्रभावी उपाय शोधण्याचे कार्य शिक्षक व विद्यार्थी इंटरनेट्च्या माध्यमातून सहज करू शकतील. ही माहिती देऊन शाळा आपल्या भोवतालच्या विकासात भरीव योगदान देऊ शकेल. उपलब्ध संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमास पूरक माहिती मराठीत टाईप केली तर मराठीत अशा ज्ञानसाठ्यात वाढ होईल व हा साठा संकेतस्थळाच्या माध्यमातून इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल. इंटरनेटची सुविधा नसलेल्य़ा शाळातील संगणकावर ही माहिती स्थापित करण्याचे कार्य ज्ञानदीप फौंडेशनतर्फे करण्यात येईल.

शाळांना या योजनेचा उपयोग अर्थसाहाय्य मिळविण्यासही करता येईल. अनेक उद्योजक व व्यावसायिक यांना इंटरनेटवर त्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा उपलब्ध ज्ञानाविषयी कल्पना नसते वा त्यांना अशा माहितीचा शोध घेण्यास वेळ नसतो. ज्ञानदीपच्या मंडळातील विद्यार्थ्यांनी नियमितपणे अशा माहितीचा शोध घेऊन ती स्कॅन वा झेरॉक्स करून संबंधितांपर्यंत पोहोचविली तर त्यातून शाळेस आर्थिक लाभ होऊ शकेल. शिवाय विद्यार्थ्यांना नव्या माहितीची ओळख होईल. मराठी टायपिंग, मराठीत भाषांतर, तसेच संगण्क शिक्षणाचे सशुल्क वर्गही शाळेस ज्ञानदीप मंडळामार्फत चालविता येतील.

ज्ञानदीप मंडळांचे कार्य प्रसिद्ध करण्यासाठी तसेच शाळा, शिक्षक, विषय तज्ञ यांच्यात परस्पर सुसंवाद व सामुहिक कार्यास मदत करण्यासाठी www.school4all.org ह्या संकेतस्थळाचा उपयोग करण्यात येणार आहे. सध्या या संकेतस्थळावर असणार्‍या सुविधां अधिक विकसित करण्यात येत असून त्यावर सहभागी शाळा, शिक्षक, व विषय तज्ञ यांची माहिती विनामूल्य देण्यात येणार आहे.

यापूर्वी मराठी, संस्कृत व विज्ञान या विषयांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळांची निर्मिती केली आहेच. आता इतिहास, भूगोल, गणित, चित्रकला इत्यादी विषयांची माहिती संकलित करण्यात येईल.school4all.org या संकेत स्थळासाठी सध्या प्रामुख्याने मराठी माध्यम वापरले आहे मात्र आवश्यकता भासल्यास व पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास तेथे इंग्रजी व अन्य भाषांचाही समावेश करण्यात येईल . .

या प्रकल्पाचा आवाका मोठा असल्याने आपण सर्वांनी या उपक्रमास सक्रीय सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या पाहण्यात आलेल्या शिक्षणविषयक मोफत माहिती देणार्‍या संकेत स्थळांचे पत्ते कळविणे, स्वतः लेख, चित्रे वा माहिती पाठविणे, उपयुक्त सूचना करणे, चुका दर्शविणे असे सहकार्य मिळाल्यास या संकेतस्थळाची व्याप्ती लवकर वाढू शकेल. स्पर्धा, प्रश्नोत्तरे व शिक्षणविषयक घटना व कार्यक्रम यांनाही या संकेतस्थळांवरून प्रसिद्धी देण्यात येईल.






ज्ञानदीप मंडळ स्थापन करून शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञानदीप फौंडेशन सर्वांना करीत आहे.