Thursday, October 20, 2011

संशोधनाचे स्फूर्तीकेद्र - विज्ञान छंदगृह

(१९८४ साली मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या म्हैसाळ येथील संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतील लेख -
विज्ञान छंदगृहाचे माझे त्यावेळचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले आहे.)
’साधे कागदाचे विमान. ते पण आता खर्‍या विमानासारखे आकाशात झेपावणार होते. सारी मुले डोळे विस्फारुन विमानाकडे पाहात होती. प्रत्येकाच्या हातात विमान करण्याचे साहित्य होते. आपनही तसेच विमान करावे अशी तीव्र इच्चा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अनेक शंकांना मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे देत एक विद्यार्थी विमानाचा तोल आणि पंखांचा बाक तपासून पाहात. होता.दुसर्‍या बाजूला एका टेबलाभोवती बरीच मुले कोंडाळे करून उभी होतॊ. इलेक्ट्रिकल उपकरणातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्याचे सर्कीट समजावून सांगण्यात एक कॉलेज विद्यार्थी गर्क झाला होता. प्रभावी विज्ञान शिक्षणाचा एक अभिनव प्रयोग सुरू झाला होता. ’

ज्या कल्पनेने मराठी विज्ञान प्रबोधिनीने हा विज्ञान छंदवर्ग सुरू केला त्यात केवळ करमणूक वा पूरक अभ्यासाची सोय एवढाच उद्देश नाही तर आजच्या विज्ञानयुगातील ते महत्वाचे राष्ट्रीय कार्य आहे ही भावना त्यामागे आहे.

विकसित राष्ट्रांत आज विज्ञान व तंत्रज्ञान यांची इतक्या झपाट्याने प्रगती होत आहे की भारतासारख्या विकसनसशील राष्ट्राला तो वेग गाठणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यातच गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा व वाढती लोकसंख्या असे अनेक प्रश्न या विज्ञानप्रगतीत , खीळ घालत आहेत. परदेशात विकसित झालेले तंत्रज्ञान व आधुनिक साधने यांचा देशात येणारा ओघ एवढा वाढला आहे की, स्वदेशी उद्योग त्यामुळे धोक्यात आले आहेत. यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या या आक्रमणामुळे आपण पुन्हा एका वेगळ्या अर्थाने परतंत्र आनि परावलंबी होण्याची भीती आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर परदेशी घड्याळे, गणकयंत्रे, टेप व व्हिडिओ कॅसेट्स अत्यंत स्वस्त किंमतीत आपल्या देशात मिळू लागल्या आहेत.या वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनाचा खर्च परदेशी मालापेक्षा बराच जास्त आहे. शिवाय तांत्रिक गुणवत्ताही तेवढी सरस नाही. साहजिकच स्वदेशी वस्तूंची विक्री पूर्णपणे परदेशी वस्तूंच्या आयातीवर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या काळात स्वदेशी मालाबद्दल आग्रह कोठेच दिसत नसल्याने हा धोका अधिकच संभवतो.

यासाठी परदेशी वस्तूंच्या एवढी तांत्रिक गुणवत्ता व किंमत असणार्‍या वस्तूंची निर्मिती हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. अर्थात त्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान यांचा जलद गतीने विकास करणे व त्यासाठी बुद्धीमान विद्यार्थ्याम्मधून तंत्रकुशल सण्शोधक निर्माण होण्यासाठी लहानपणापासून संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

शाळा, कॉलेजात विज्ञान शिक्षण मिळत असले तरी परीक्षा पद्धतीस अवास्तव महत्व दिले गेल्याने जिज्ञासू व धडपड्या मुलांची फार कुचंबणा होते. यावर उपाय म्हणजे केवळ मुलांसाठी विज्ञान छंदगृहांची उभारणी. या विज्ञान छंदगृहातून महत्वाचे संशोधन वा नवीन तंत्रज्ञानाचा विकास होणे असंभवनीय असले तरी उद्य़ाचे संशोधक तयार करण्यासाठी मुलांवर योग्य ते संस्कार करण्याचे कार्य या छंदगृहांमुळे निश्चितच साध्य होईल.

या विज्ञान छंदगृहामध्ये मुलांना त्यांच्या कल्पनेनुसार प्रयोग करण्याचे व उपकरणे बनविण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पक्त आवश्यक भासेल त्यावेळीच दिले जाईल. अन्यथा सर्व मार्गदर्शन मोथि मुले छोट्या मुलांना करतील. संदर्भ ग्रंथालय, कार्यशाळा व इतर साधनसामुग्री यांची सोय येथे करावी लागेल. विज्ञानाच्या विविध शाखा लक्षात घेता सर्व साधनसामुग्री या छंदगृहात सुरुवातीपासून उपलब्ध करून देणे अवघड आहे यात शंका नाही. परंतु टप्प्याटप्प्याने जागा व साधनांचि तरतूद करत गेल्यास मुलांच्या आवाक्यात असणार्‍या बहुतेक सर्व प्रयोगांसाठी सोय करणे शक्य आहे. अर्थात हे सर्व जनतेकडून आणि विशेषकरून मुलांच्याकडून किती प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे.

मुलांच्या मनांत अशा छंदगृहाबद्दल कुतुहल व आकर्षण निर्मान होण्यासाठी सर्वप्रथम काही मोजक्या पण अत्याधुनिक अशा तयार उपकरणांचा वापर करावयास हवा. उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाश, रंग व आवाज यांची आतषबाजी करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर राहून नियंत्रित करता येणार्‍या ( रिमोट कंट्रोल्ड) मोटारी, आकाश दर्शनासाठी मोठी दुर्बीण शिक्षणाच्या दृष्टीने याचा उपयोग थोडा असला तरी मुलांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य या उपकरणात निश्चितच आहे. प्रथम केवळ करमणूक म्हणून मुले आली तरी तशी उपकरणे बनविण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण होईल व त्यासाठी सर्व मदत छंदगृहात मिळेल हे कळल्यावर कुतुहलातून शिक्षण, शिक्षणातून प्रयोग व प्रयोगातून संशोधन ही साखळी प्रक्रिया सुरू होईल.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक मोकळा हॉल, दोन टेबले व इलेक्ट्रॉनिकची काही सर्कीट यावर छंदगृहाची सुरुवात होऊ शकेल. याच हॉलचा उपयोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, फिल्म वा स्लाईडशो यासाठी होऊ शकेल. १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही सोपी सर्कीत तयार करण्यास सांगणे शक्य आहे. यास साधने कमी लागतात. खर्च कमी येतो. यापुधचा टप्पा म्हणजे फेविकॉल, प्लॅस्टिक, पत्रा व लाकूड यांचा वपर करून उपकरणे बनविण्याची सोय करणे. त्यासाठी आवश्यक असणारि सामुग्री व हत्यारे विकत घेऊन काही उपकरणे मुलांच्याकडून करवून घेणे. यामध्ये प्रथम भर द्यायचा तो स्प्रिंग, लोहचुंबक आणि बॅटरी सेल यांच्या साहाय्याने स्वयंचलित खेळणी बनविण्यावर. कारण खेळण्याचे आकर्षण मुलांना स्वभावतःच असते. शिवाय खेळणे बनविताना वस्तूचे गुणधर्म व वैज्ञानिक तत्व यांचीही मुलांना माहिती होते.

मनोरंजनातून पुढची पायरी म्हणजे नेहमीच्या वापरातील उपयुक्त साधने व उपकरणे बनविणे. ताणकाटा, विजेची घंटा, कारंजे,रॉकेलचा पंप यासारख्या वस्तू बनविताना दैनंदिन व्यवहारात विज्ञानाचा कसा उपयोग होतो हे समजेलच शिवाय ही उपकरणे स्वतः तयार केल्याने प्रयत्न केल्यास आपण मोठे कारखानदार होऊ असा आत्मविश्वास मुलांच्या मनात निर्माण होईल.
यानंतरचा टप्पा म्हणजे सूर्यशक्टीवर चालणारी आधुनिक साधने, पवनचक्की, बायोगॅस संयंत्र यासारख्या उपकरणांची कार्यपद्धती, तांत्रिक ज्ञान आणि निर्मिती याविषयी माहिती उपलब्ध करून देणे. विज्ञानविषयक मराठी, इंग्रजी पुस्तके, मासिके व इंटरनेट यावरून अशी माहिती मिळू शकते. तज्ज्ञाम्चे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रतिकृती व साधनांचे निरीक्षण यातून मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणे सहज शक्य होईल.

या छंदगृहासाठी जनमानसात कुतुहल व आकर्षण निर्माण करण्यासाठी एक प्रभावी उपकरण म्हणजे दुर्बीण. छंदगृहातून या दुर्बिणीच्या साहाय्याने नियमितपणे आकाशदर्शनाचे कार्यक्रम व्हावेत. त्याद्वारे चंद्राचा पृष्ठभाग, गुरूचे गृह आणि शनीची कडी, सूर्य व चंद्र ग्रहण क्वचितप्रसंगी धूमकेतू पहायला मिळतात असे कळल्यावर सर्वसामान्य जनताही छंदगृहाकडे आकर्षित होईल.

माझ्या डोळ्यासमोर जे उद्याच्या भारताचे स्वप्न आहे त्यात गावोगावी मध्यवर्ती ठिकाणी अशी विज्ञान संशओधन छंदगृअहे आहेत व नव्या पिढीची स्फूर्तीकेंद्रे म्हणून ती काय करीत आहेत. आपल्या फुरसतीच्या वेळात, सुट्टीत व रात्रीदेखील छोटे संशोधक त्यात उपकरणे बनवीत आहेत. प्रयोग करीत आहेत. स्वतः धडपडत शिकत आहेत. कुशल तंत्र वैज्ञानिक व शास्त्रज्ञ बनण्याची ईर्षा त्यांच्या मनाम्त निर्मान होत आहे. त्यातूनच ग्रामविज्ञानाच्या कल्पनेने भारलेले काही तरूण दूर दुर्गम ग्रामीण भागांत जाऊन तेथे विज्ञानाचा नवा प्रकाश पोहोचवीत आहेत. इतर काही प्रयोगशाळातील संशोधनातून निसर्गाची रहस्ये उलगडण्याची उमेद बाळगून आहेत. काही तंत्रज्ञ बनून विविध वस्तूंच्या निर्मितीप्रक्रियांचे ज्ञान मिळविण्याच्या मागे आहेत. तर काही जीवरासायनिक, वैद्यकीय वा पर्यावरण शास्त्रात नवे संशोधन करण्यात रंगून गेले आहेत.

या छंदगृहातील प्रयोगांचे व चर्चांचे पडसाद मोठ्या माणसांच्या सुस्त प्रयोगशाळा, संथ कारखाने आणि मंद उत्पादन केंद्रे यावर आदळून नवी क्रांती घडवून आणित आहेत.छोट्या संशोधकांच्या कार्याने सारे खडबडून जागे झाले आहेत आणि नवा विज्ञानाधिष्ठित बलशाली भारत उदयास येत आहे.

हे स्वप्न तर खरेच, पण विस्फारलेल्या डोळ्याम्नी उपकरणे पाहणार्‍या मुलांच्या नजरेतून, बुद्धी गुंग करणार्‍या त्यांच्या प्रश्नांमधून आणि वक्तृत्वातील जोषात हे स्वप्न वास्तव सृष्टीत येणे सहज शक्य आहे असा मला विश्वास वाटतो.

Monday, October 17, 2011

मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण

पाडव्याच्या सुमुहूर्तावर ज्ञानदीप वेबडिझाईन, फ्लॅश/अ‍ॅनिमेशनचे मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे. घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हे कोर्सेस करून स्वत:च्या नव्या व्यवसायाची सुरुवात करा वा ज्ञानदीपच्या परिवारात सामील होऊन उद्योगी बना.

हे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा उद्देश ज्यांना या क्षेत्रात नोकरी वा स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशांसाठीच आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची तयारी असणार्‍यांनीच या कोर्ससाठी नावे नोंदवावीत.

विषयातील धड्यांची आखणी क्रमवार केलेली असून धड्यातील माहितीचे पूर्ण आकलन झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पूरक प्रश्नावली व गृहपाठ पूर्ण करणे अनिवार्य राहील. गृहपाठासाठी दिलेली सर्व उदाहरणे स्वतः सोडवून ज्ञानदीपकडे तपासण्यासाठी पाठवावी लागतील. अर्थात त्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. आपल्या फुरसतीच्या वेळेत कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यास आपल्या सवडीप्रमाणे गृहपाठ पूर्ण करता येतील मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यानंतरच पुढील धडा देण्यात येईल. साहजिकच कोर्ससाठी शेवटी वेगळी परीक्षा असणार नाही. कोर्स समाप्तीनंतर ज्ञानदीप फौंडेशन तर्फे कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीचे सर्टिफिकेट आवश्यक असल्यास वेगळे परीक्षाशुल्क भरून त्यांच्या ऑनलाईन परिक्षेत पास व्हावे लागेल.

प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतःचा ब्लॉग, ट्विटर अकौंट सुरू करून आपली प्रगती व स्वतःचे लेख प्रसिद्ध करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच सार्वत्रिक उपयोगाच्या लेखांना ज्ञानदीपच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.( info@dnyandeep.net)