Friday, September 23, 2016

सय काव्यसंग्रह


मनोगत  
सौ. शुभांगी सु. रानडे 


 प्रिय वाचकहो,

 एक नवा कवितासंग्रह घेऊन पुनः एकदा मी आपल्या भेटीला येत आहे.
काव्यदीप व सांगावा हे माझे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याहातून सय हा तिसरा काव्यसंग्रह लिहून होईल असे वाटले सुद्धा न्व्हते. पण आज तो योग आला आहे खरे.
यासाठी मला मनापासून आभार मानायचे आहेत ते त्या देवरायाचे. त्याने आपल्याला किती म्हणून द्यायचे ? आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत मावणार नाही एवढे भरभरून सुख सुख दिले आ्हे त्याने. त्यामुळॆ त्याचे गुणगान करणारे शब्द हे आपोआप कवितारूप घेऊन आले. तसे लग्नाच्या अगोदर पुण्याच्या पेंडसे चाळीतील एका लहानशा खोलीत राहणार्‍या मला स्वतःच्या मोठ्या घरात-बंगल्यात राहिल्यावर माणसांची सोबत तशी थोडी कमीच; पण निसर्गाची, झाडाझुडपांची, कुत्र्यामांजरांसारख्या प्राण्यांची व विविध प्रकारच्या पक्ष्यांची सोबत मात्र भरपूर मिळाली. त्यामुळेच ही सर्व मंडळी कवितारूप कधी झाली ते समजलेच नाही.

यअ कवितांची मला मोठी मौज वाटते.प्रत्येक कविता अगदी थाटामाटात येते. तिचा पेहराव, दागदागिने, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकीचा नखरा काही औरच अवतो. कधी रुमझुम रुमझुम पैजणांचा नाजुकसा नाद करत, हातातल्या बांगड्यांची किणकिण करत, कधी लहान बाळासारख्ही दुडुदुडु धावत, कधी  ठुमकत ठुमकत, कधी  मधुर चिवचिव करत, कधी भ्रमरासारखा गुंजारव करत, तर कधी कोकिळेसारखा मंजुळ कुहूरव करतगाण्याची चाल लडिवाळपणे माझ्यापाशी कधी लगट करते तेकळतच नाही. आणि मग शब्दांचे थवेच्या थवे कोठूनसे येतात व त्या गेय कवितेच्या गाडीत जागा पटकविण्यासाठी त्यांची एकच झुंबड उडते. त्यातून निवड करून योग्य त्या शब्दांना जागा मिळवून देण्याचे काम माझ्याकडून केले जाते. बाकी सर्व आपोआप जुळून येत असावे असे मला वाटते. देवाजीची किमया दुसरे काय !

देवाचे आभार मानायचे दुसरे कारण म्हणजे त्याने संसारात सोबतीला देलेला जोडीदार डॉ. सु. वि. रानडे हे होय. पुष्पासंगे मातीस वास लागे, थोडीफार अशीच अवस्था झाली आहे माझी. म्हणजे असे की अत्यंत हुषारी पण तितकीच नम्रता, सुस्वभावी, समाधानी वृत्ती असणारा सहचर लाबल्यावर त्याच्या अंगच्या सद्‌गुणांचे काही कन माझ्यात उतरायला थोडा वेळ लागला खरा.

पण आनंद यातच की त्यामुळे आमच्यात कधीच साधा वादविवाद सुद्धा होत नाही. मग राग-लोभ तर दूरच ! जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मला अनमोल मदत व योग्य ते मार्गदर्शन करणार्‍या माझ्या जीवनसाथीदारास माझे शतशः धन्यवाद ! केवळ धन्यवाद मानून ऋणातून उतराई न होता सदैव त्यांच्या ऋणात राहण्यातच मला अधिक आनंद आहे.

सोन्यासाराखी सुंदर मुले व नातवंडे माझ्या पदरात टाकणार्‍या देवाचे आभार मानण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. संसारातील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडल्यानंतर आता मन अत्यंत तृप्त,सशांत, समाधानी झाले आहे. तसेच जीवनाचा पेला आनंदाने, समाधानाने काठोकाठ भरलेला आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत ज्ञानदीपच्या सर्व सहकार्‍यांची लक्षणीय मदत झाली. तसेच छपाईचे कामही फारच थोड्या कालावधीत पूर्ण करून दिल्याबद्दल श्री सेल्स‌चेश्री. यशवंत पाटील यांचे आभार.
                                          सौ. शुभांगी सु. रानडे 
------------------------------------------------------
प्रस्तावना
सौ. सुमेधा गोगटे
कॅलिफोर्निया, अमेरिका
सौ. शुभांगी रानडे – माझी आई – यांचे काव्यदीप व सांगावा हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेतच. आज सय हा तिसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे.
‘सय’ म्हणजे आठवण. आठवण आई-बाबांची, भावाबहिणींची, मित्रमैत्रिणींची अगदी घरादाराचीही. माणूस अशा ह्या आठवणींमध्येच रममाण होत असतो. 
आई म्हणते त्याप्रमाणे ह्या कविता सुमधुर चालीतूनच जन्माला आल्या आहेत. त्यामुळे ह्या कवितांची खरी गोडी कळते ती प्रत्यक्ष तिच्या तोंडून ऎकल्यावरच. मात्र ह्या चाली  निवडण्याचे व त्यात समर्पक शब्द गुंफण्याचे कसब आईच करू जाणे. या पुस्तकात केवळ कविता असल्या तरी ह्या कविता वेबसाईट व सीडीवर ध्वनीफितींसह प्रसिद्ध केल्या असल्याने त्यांचा रसिकजनांना आस्वाद घेता येईल. 
मी आईला नेहमी म्हणते, ‘तुला ह्या कविता सुचतात तरी कशा?’ तर तिचे आपले साधे आणि एकच उत्तर – ‘अशाच सहज’. जरा विचार केल्यावर मला जाणवते आहे की ती ह्या कविता स्वतः जगतेच आहे सकाळी उठल्यापासून सडा, रांगोळी, फुले, पक्ष्यांचे आवाज, रेडिओवरचे भक्तिसंगीत या व अशा अनेक गोष्टीत ती गुंग झालेली असते. दारातल्या तुळशीचे मनही तिला कळते. पारिजातकाच्या झाडाशी ती गुजगोष्टी करते. आणि मागील दारी येणार्‍या मांजर-कुत्र्यांशीही तिचे संभाषण चालू असते.
या संग्रहातल्या तुळशीबाई, पारिजाताचा सडा, आंबामोहोर, सारमेयास - या कविता वाचताना मला आमच्या घरची सकाळ आठवते. नवे घर, मायेचा गाव, दिवाळीचा किल्ला, भूपाळी, गारा आल्या या कवितांमधून प्रत्येकाला आपल्या घराची, गारांच्या पावसाची, भूपाळीपासून संध्याकाळच्या परवच्यापर्यंत ऎकू येणार्‍या धुनींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.या कवितांमधून कवयित्रीचे संवेदनशील मन आपल्याला दिसते व भावतेही.
आमची आई सगळ्या देवांची पूजा मनोभावे करते तिने केलेले विठ्ठलाचे, शंकराचे, मारुतीचे, दत्ताचे, रामाचे स्तुतीगान तितक्याच भक्तिभावाने केले आहे. केवळ कर्मकांडापेक्षा मनापासून केलेली देवाची पूजा याला ती अधिक महत्व देते. जीवन, मनपाखरू, काळाची पायवाट, अखेरचे पर्व यासारख्या कविता आपल्याला जीवनाचे सार सांगून जातात. अंतर्मुख करून टाकतात. जगण्याचं सार्थक हे आनंदी व समाधानी राहण्यात आहे, हे शिकवितात.
सध्याचे जग माणसांना पैशामागे पळायला भाग पाडते. त्यामुळे माणसे जगण्याचा खरा अर्थच विसरून जातात. अशा आजच्या धावत्या जगात, निर्विकार, निरंतर आनंद देणार्‍या , वेळेच्या बंधनात न अडकणार्‍या कवितांची गरज आहे. या कवितासंग्रहातल्या कविता आठवणींवर आधारित आहेत. पण आठवण येऊन उदास करणार्‍या नाहीत. हुरहुर लावणार्‍या नाहीत. मुलं मोठी होऊन घराबाहेर गेल्यावर पालकांना वाटणारी ओढ,  काळजी यात आहे. घरापासून दूर गेलेल्या आम्हा मुलांना आईवडिलांची आठवण आली की या कविता मनाला शांतता, दिलासा देतात. आईवडील सदैव आपल्याबरोबर आहेत याचा अनुभव देतात.
विषय छोटा असो वा मोठा. आमची आई हाडाची शिक्षिका असल्याने कितीही अवघड विषय असला तरी तो सोपा करून कसा सांगावा हे तिला चोख जमते. म्हणूनच अगदी साध्या शब्दांमधूनही उदाहरणे देऊन मोठे गहन विचार मांडण्याची हातोटी या कवितांमधून दिसते.
सौ. सुमेधा गोगटे
कॅलिफोर्निया, अमेरिका
----------------------------
Say Poem App and enjoy reading the poems and listen them in Shubhangi's her own voice

No comments:

Post a Comment