Saturday, July 6, 2013

अकौंटिंग भाग २ - अकौंटिंगचे पायाभूत समीकरण

कोणत्याही उद्योगाचे मूल्यमापन आपण त्याच्या एकूण मालमत्तेवरून करतो. अशी मालमत्ता आपल्याला ताळेबंदातून (Balance Sheet)  कळते. आपण बर्‍याच उधोगधंद्यांचे ताळेबंद पाहतो. त्यावेळी त्यात असेट व लायॅबिलिटी या दोन रकान्यातील एकूण रक्कम एकसारखीच असल्याचे आपल्याला दिसते. असेट म्हणजे मालमत्ता आणि लायॅबिलिटी म्हणजे देणे वा कर्ज असल्याने उद्योगाला त्याच्या एकूण मालमत्ते एवढेच एकूण देणे असल्याचे लक्षात आले की आपण चक्रावून जातो. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो.

 विश्वाची निर्मिती शून्यातून झाली व त्याचा विनाशहि शून्यात होणार असे म्हणतात. तेव्हा तेही आपल्या समजशक्तीच्या बाहेरचे ठरते. उद्योगाच्या बाबतीत मात्र हे खरे आहे. उद्योगाची निर्मिती कोणीतरी भांडवल घालून केलेली असते. म्हणजे उद्योगाच्या दृष्टीने मालमत्ता तयार झाली असली तरी उद्योगावर मालकाचे तेवढेच देणे वा कर्ज  असते.  उद्योगाच्या सुरुवातीलाच उद्योगाची मालमत्ता बरोबर एकूण भांडवल असे समीकरण  आपल्याला मांडता येते. अकौंटिंगमध्ये असेट = लायॅबिलिटी  Assets=Liabilities याच मूलभूत समीकरणाचा वापर केला जातो. उद्योगात फायदा होवो वा तोटा होवो हे समीकरण बदलत नाही. उद्योगाची कितीही भरभराट झाली तरी हे समीकरण तसेच राहते फक्त त्याचे स्वरुप बदलते

  म्हणजे उधारीवरील व्यवहारांचा समावेश केल्यास हे समीकरण असे लिहिता येते.

एकूण मालमत्ता + एकूण येणे = भांडवल पुरविणारांचे कर्ज + एकूण देणे

Total Assets + Accounts Receivable = Total Capital + Accounts Payable

अकौंटिंगमध्ये बॅलन्स शीटला पार महत्व आहे. त्याव्रून उद्योगाच्या आर्थिक स्थितीची आपणास यथार्थ कल्पना येते.

अकौंटिंगच्या सोयीसाठी असेटमध्ये फिक्स्ड असेट्स (स्थावर मालमत्ता) व करंट असेट्स ( जंगम मालमत्ता) असे वर्गीकरण केले जाते.

 अकौंटिंगचे आर्थिक वर्ष १ एप्रिल पासून ३१ मार्चपर्यंत असते. या एका वर्षात झालेली आर्थिक उलाढाल आपल्याला ट्रायल बॅलन्स (Trial Balance) वरून समजते.

खरेदी विक्री विषयक व्यापाराच्याबाबतीत प्रॉफिट - लॉस स्टेटमेंट तर इतर व्यवहारांसाठी इन्कम- एक्स्पेंडिचर  स्टेटमेंट  एका वर्षातील आर्थिक स्थितीतील बदल दर्शविण्यास उपयुक्त ठरतात.

अकौंटिंग करण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहारांची व्हाउचर्स म्हणजे पैसे व माल देण्याघेण्याच्या पावत्या, बिलबुके, पर्चेस ऑर्डर्स यातील माहितीची नोंद तारखेनुसार  रोजकीर्दीत (Cash and Bank Day book) केली जाते.   त्यातील प्रत्येक व्यवहाराची नोंद लेजर बुक(Ledger book)  मध्ये दोन खात्यात डेबिट व क्रेडिट स्वरुपात केली जाते  यामुळे   प्रत्येक खात्यावरील एका वर्षातील व्यवहार एकत्रितपणे पाहता येतात. 




1 comment:

  1. Connect your blog on Marathiblogs.in and increase visitors and also win prises.

    ReplyDelete