Sunday, February 12, 2012

बहुढंगी करमणूक

मल्टीमिडीया याला पर्यायी मराठी नाव मी बरेच दिवस शोधत होतो. दृक्‌श्राव्य हा संस्कृत शब्द योग्य असला तरी तो मराठीसाठी तसा उपराच वाटतो. बहुरंगी करमणूक या पुस्तकाची माहिती लिहिताना मला जाणवले की ‘बहुढंगी’ हाच यासाठी योग्य शब्द ठरेल. बहुरंगी करमणूक या पुस्तकात मुखपृष्ठ सोडल्यास कोठेच वेगळा रंग नाही. पण तेथे रंग हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला आहे. तसेच ढंग हा शब्दही रंग, रूप, आवाज व हालचाल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वापरता येईल.

संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनोरंजन क्षेत्राला नवी संजीवनी मिळाली आहे.व्हिडीओ गेम्सनी सार्‍या जगाला भुरळ घातली आहे. विकसित देशात तर पुस्तके, खेळणी, टीव्ही, मोबाईल या सर्व माध्यमात मल्टीमिडीया आधारित मनोरंजन हा मोठा व्यवसाय बनला आहे. २००३ मध्ये मी अमेरिकेत असतानाच मला याची प्रचिती आली होती. माझ्या ब्लॉगची सुरुवात मी Toy Mania या नावाचा लेख लिहून केली होती. त्यात अशा व्यवसायाचा नवीन पिढीवर किती वाईट परिणाम होत आहे याबद्दल मी माझे मत मांडले होते.

आता मल्टीमिडीया तंत्रज्ञानाने मनोरंजनातून शिक्षण देण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही चांगली गोष्ट आहे. बहुरंगी करमणूक या पुस्तकातील हसत खेळत शिक्षण या तत्वाचेच आधुनिक रूप म्हणजे ही बहुढंगी करमणूक आहे असे मला वाटते.

शिक्षणासाठी मल्टीमिडीया तंत्रज्ञान वापरल्याने शिक्षण (e-Learning) तर प्रभावी होतेच पण त्याचे स्वरूप पुस्तकी न राहता त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कोठे व कसा उपयोग होतो हे दाखविता येत असल्याने शिक्षणाचे उद्दिष्टही पूर्णपणे साध्य होते.

शिक्षणातील मल्टीमिडीयाचे महत्व वाढल्याने या तंत्रज्ञानाच्या संशोधनास अधिक चालना मिळाली आहे. फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग व व्हीडिओ एडिटींग या क्षेत्रात जागतिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद,बंगलोर, दिल्ली, चेन्नई यासारख्या महानगरात अशा अनेक कंपन्या वरील आधुनिक विषयात तज्ज्ञ असणार्‍या व्यक्तींच्या शोधात आहेत. दुर्दैवाने प्रचलित शिक्षणपद्धतीत संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमातही या तंत्रज्ञानाला विशेष स्थान नाही. शिवाय हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रातील शिक्षणास स्थायी अभ्यासक्रम पद्धत उपयुक्त ठरत नाही.

काळाची पावले ओळखून आमच्या ज्ञानदीप इन्फोटेकमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा अभ्यास व उपयोग ही पद्धत अवलंबल्याने सांगलीसारख्या छोट्या शहरात राहूनही उच्च दर्जाचे काम व मोठ्या शहराप्रमाणे जास्त आर्थिक लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
आता हे ज्ञान सांगलीतील रोजगाराच्या शोधात असणार्‍या हुशार मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने वेब डिझाईन व फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग मराठीतून शिकविण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून याविषयी लेख व प्रात्यक्षिके व प्रकल्प याची माहिती देण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

याचा पुढचा टप्पा म्हणजे या क्षेत्रात काम करू शकणार्‍या विविध ठिकाणच्या व्यक्तींना सहभागी करून व प्रशिक्षित करून त्याना घरबसल्या काम मिळवून देणे हा आहे.

Saturday, February 11, 2012

बहुरंगी करमणूक - पुस्तक परिचय

माझे गुरू व नंतर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधील माझे ज्येष्ठ सहकारी कै. रा. त्र्यं. रानडे यांनी अनेक कोडी, विनोद, कसरती, करामती यांचा संग्रह करून ‘बहुरंगी करमणूक’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. १९४९ ते १९६७ या काळात या पुस्तकाचे तीन भाग प्रसिद्ध झाले. पुस्तकातील भाषा चित्तवेधक व खेळकर शैलीत लिहून कै. रानडे यांनी या पुस्तकांना एक वेगळी उंची मिळवून दिली. ही पुस्तके लहान थोर सर्वांनाच फार आवडली व त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.


आज ही पुस्तके फक्त काही जणांकडे व जुन्या वाचनालयातच उपलब्ध आहेत. आजच्या पिढीला या पुस्तकांची ओळख करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे.
पुस्तकात खालील विभाग आहेत.
* फसाल बरं का !
* हसाल बरं का!
* नीट सांगा बरं का !
* केवळ दृष्टीनेच ओळखा.
* कुठे आहे चूक ?
* बडे आकडेशास्त्रज्ञ व्हा.
* परीक्षा
* उत्तरे
बहुरंगी करमणूक पहिला भाग-प्रास्ताविक - सारांश
अनेकांचा एकच प्रश्न !
कंटाळवाणा काळ काढावयाचा कसा ? ... अगदी सार्‍या सार्‍यांची हीच अडचण.! आणि म्हणूनच पोरासोरांपासून तो म्हातार्‍या कोतार्‍यांपरयंत, छोट्या बाळापासून तो काठी टेकीत जाणार्‍या रंगोपंतापर्यंत, सार्‍यांची हीच अडचण भाग्विण्यासाठी ‘बहुरंगी करमणूक ’ मोठ्या तत्परतेने सिद्ध ठाकले आहे.
अर्थात केवळ कालहरण इतकाच मात्र त्यातील हेतु निश्चित नव्हे. आणखी कितीतरी भाग त्यात आहे.
.....
बहुरंगी करमणूक तुमची प्रवासात उत्तम सोबत करील आणि तुमच्या सहली नि सफर तर त्याविना निश्चित अळणी ठरतील ! हे पुस्तक तुमची भरपूर करमणूक करील. नेहमीच्या चाकोरीबाहेर ते तुम्हाला घेऊन जाईल. निरनिराळ्या करामती नि गमती सांगेल आणि पुस्तक वाचन थांबविल्यावर तुम्हाला आढळून येईल, की तुमचा शीण नाहिसा झाला आहे आणि कंटाळ्याने तर केव्हाच काळे केले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हेही समजून येईल की घटकाभर मन रंजन करता करता या पुस्तकाने तुमच्या मनाला तरतरी आणली आहे नि तुमच्या बुद्धीचे वेगवेगळे पैलूही तुम्हाला कळत नकळत त्याने मोठ्या कौशल्याने उजळले आहेत. तसेच त्याद्वारे चारचौघावर छाप पाडण्यास योग्य अशी नाना प्रकारची भरगच्च सामुग्रीही आता तुमच्या हाती लागली आहे.

`बहुरंगी करमणूक' पुस्तकाच्या तिसर्‍या भागात लेखकाने करमणूक, कोडी व त्यातून मिळणारे शिक्षण व बुद्धीला कार्यप्रवण करण्याचे कार्य कसे होते याविषयी मौलिक विचार मांडले आहेत. ते त्यांच्याच शब्दांत वाचा.



या पुस्तकातील कोडी व कूट प्रश्नांनी मला अधिक चौकस बनविले व करमणुकीच्या या पद्धतीने शिक्षण किती आनंददायी ठरते हे लक्षात आले. स्वतः स्थापत्य अभियांत्रिकीत तज्ज्ञ प्राध्यापक असूनही त्यांनी लहान मुलांसाठी, हसत खेळत त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, यासाठी वेळ काढून अशी पुस्तके लिहिण्याचे कार्य केले. त्यापासून मला अशा कार्याची आवश्यकता पटली असून असे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना माझे नम्र अभिवादन
---
‘बहुरंगी करमणूक’ एकमेव विक्रेते - अभिनव पुस्तक मंदीर, डेक्कन जिमखाना, पुणे - ४

Sunday, February 5, 2012

नागरिकशास्त्र - एक महत्वाचा पण दुर्लक्षित विषय

शालेय स्तरावर अभ्यासास असणार्‍या विविध विषयांच्या भाऊगर्दीत नागरिकशास्त्र हा महत्वाचा विषय आपले महत्व हरवून बसला आहे. लहान मूल जसे मोठ्यांचा हात धरून असते त्याप्रमाणे इतिहास भूगोलाच्या विषय जोडगोळीत नागरिकशास्त्रास अंग चोरून बसावे लागत आहे. प्रश्नपत्रिकेतही या विषयावर एखादाच प्रश्न व तोही क्लिष्ट व्याख्या व मुद्दे पाठ करून लिहावा लागत असल्याने मुले शक्यतो हा विषय ऑप्शनला टाकतात. साहजिकच सुजाण नागरिक बनण्याचे शिक्षण न घेताच शालेय शिक्षण पूर्ण होते.

आपल्या देशात राज्यघटना, लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांची कर्तव्ये याबाबतीत सर्वसामान्य जनतेत जे अज्ञान दिसून येते याला नागरिकशास्त्रासारख्या महत्वाच्या विषयाकडॆ केलेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत आहे असे मला वाटते.

आपल्याकडे नागरिकशास्त्र या विषयाला महत्व दिले जाते ते फक्त प्रशासकीय उच्च पदासाठी असणार्‍या स्पर्धा परिक्षांमध्ये. या परिक्षा देणार्‍यांची संख्या फारच कमी असते. नागरिकशास्त्र सर्व जनतेसाठी असावयास हवे व ते लहानपणीच, संस्कारक्षम वयात म्हणजे शालेय स्तरावर दिले गेले पाहिजे. राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठीदेखील नागरिकशास्त्राची पदवी परिक्षा अनिवार्य ठेवली तर राजकारण व सहकार यात निश्चित सुधारणा होईल.

इतर सर्व विषय व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय यांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजते. मात्र नागरिकशास्त्रास व्यक्तीच्या दृष्टीने फार महत्व नसले तरी समाजाच्या व देशाच्या दृष्टीने याला अनन्य साधारण महत्व आहे. हा विषय अधिक सोपा, रंजक करून तसेच त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देऊन लोकशाही, समाजवाद व राष्ट्रीयत्व यांचे महत्व मुलांच्या मनावर बिंबवले तर मोठेपणी त्यांचेकडून भ्रष्टाचार, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. जातीय, धार्मिक वा प्रांतीय भेदांच्याऎवजी राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्या मनात जागृत होईल व शांतता, विकास व सहजीवन या दिशेने भविष्यात आपल्या देशाची वाटचाल सुनिश्चित होईल.