Sunday, November 14, 2010

बालदिन

पंडित जवाहरलाल नेहरूंचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. उद्याचे भविष्य घडविणार्‍या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या भावविश्वाशी समरस होऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व त्यांना योग्य ते शिक्षण देण्याची जबाबदारी मोठ्यांच्यावर आहे ही जाणीव बालदिन साजरा करताना असावयास हवी.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असताना मुद्दाम वेळ काढून पंडित नेहरूंनी आपल्या मुलीवर असे संस्कार करण्यासाठी लिहिलेली पत्रे जगप्रसिद्ध आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवाच्या प्रगतीचा व भारताच्या उदयाचा इतिहास त्यांनी आपल्या पत्रांतून अत्यंत सोप्या भाषेत विशद केला व अप्रत्यक्षपणे पुढील जबाबदारीची जाणीव इंदिरा गांधींच्या मनात निर्माण केली. त्याचीच परिणती एका प्रगल्भ व राष्ट्रीय नेतृत्वात झाली. 'Letters to daughter' या त्यांच्या पुस्तकाचे महत्व आजही कायम आहे.

पंडित नेहरूंना मुले फार आवडत. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात ते रममाण होत यामागे त्यांचे संवेदनशील भविष्यवेधी मन होते. मुलांनाही ते फार आवडत कारण ते मुलांमध्ये आपले मोठेपण विसरून मुलांसारखे वागत असत. त्यांना लाभलेले असे मुलांचे प्रेम मिळविणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी आपले ज्येष्ठत्व, आपली प्रतिष्ठा व लोक काय म्हणतील याचा विचार करता कामा नये.

असे केले तर आपल्याला आपले हरवलेले बालपण प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे आपण म्हणतो. कारण त्यावेळी आपले मन नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे निर्मळ असते. निसर्गाकडे व भोवताली घडणार्‍या घटनां पाहण्याचा आपला दृष्टीकोन कुतुहलाचा व निकोप असतो. पूर्वग्रहाने, काळजीने वा आशाआकांक्षांनी मन ग्रासलेले नसते. ते अधिक संवेदनशील असते. त्यामुळे आपल्याला जीवनातील खरा आनंद अनुभवायला मिळतो.

सुदैवाने अशी संधी मला सतत मिळत राहिली. आम्ही चौघे भाऊ, मी सर्वात थोरला व भावाभावात ४/५ वर्षांचे अंतर. यामुळे सर्वात थोरला मुलगा म्हणून धाकट्या भावांना सांभाळण्याचे काम माझ्याकडे होते. साहजिकच लहान मुलांच्यात मिसळण्याचे प्रसंग नेहमी येत. पुढे लग्नानंतर माझी मुलगी सुमेधा व मुलगा सुशांत यांच्याबरोबर वागताना त्यांच्या व माझ्यामध्ये वडिलकीचा अडसर य़ेऊ नये याची मी पुरेपूर दक्षता घेतली. त्यांच्याकडूनही मला बरेच काही शिकायला मिळाले. सुमेधा विलक्षण संवेदनशील होती. साधा शांत स्वभाव, दुसर्‍यांच्या आनंदात मोकळेपणाने सामील होणे व केवळ दुसर्‍या व्यक्तीच नव्हे तर किडामुंगीसारख्यांचे दुःखही तिला जाणवत असे व डोळ्यात पाणी तरळू लागे. अशाच एका प्रसंगावर मी माझी ‘भिंग’ ही कथा लिहिली. सुशांत हा धडपड्या स्वभावाचा, प्रचंड कुतुहल व संशोधक वृत्तीचा होता. विज्ञान विषय त्याच्या सर्वात आवडीचा. कोणतीही वस्तू वा खेळणे यांची मोडतोड करून त्याचे कार्य समजावून घेणे व पुनः ते जोडण्याचा प्रयत्न करणे त्याचा नेहमीचा छंद होता. भविष्यकाळातील कला व संशोधनातील त्याच्या यशाच्याच त्या निदर्शक होत्या हे आता मला उमजले आहे.

सुमेधाच्या दोन मुलांशी व सुशांतच्या मुलीशी आजोबा या नात्याने संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. केतन (अनंत) हा सुमेधाचा थोरला मुलगा. तो आपल्या आईप्रमाणेच अतिशय हळवा व कलावंत वृत्तीचा असल्याने त्याच्याशी खेळताना मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. गूढतेचा शोध घेण्याची त्याची वृत्ती, पोकिमॅनच्या कथानकात ( अमेरिकेत वास्तव्य असल्याने) रंगून जाणे व अत्यंत चिकाटीने पेपर ओरिगामी व मेकॅनोच्या गुंतागुंतीच्या रचना करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, हार्मोनियम वाजवणे व भावपूर्ण इंग्रजी कविता करणे यातून त्याच्या भविष्याचा अंदाज घेणे शक्य आहे.

सुशांतची मुलगी अनुषा अतिशय जिज्ञासू, संवेदनशील व अनुकरणप्रिय आहे. वडिलाचा धडपड्या स्वभाव व आईचा टापटीप व व्यवस्थित राहण्याचा गुण तिने नकळत उचलला आहे. समोरच्या माणसाचे बोलणे, वागणे, सवयी यांचे ती हुबेहूब अनुकरण करते. भातुकलीचा खेळ खेळताना ती ज्या काळजीपूर्वक स्वयंपाक करून खोटे खोटे वाढते त्यावरून तिच्या बुद्धीमत्तेची कल्पना येते. सांगलीत आल्यावर माझी पत्नी सौ. शुभांगी हिच्याशी तर तिची अगदी गट्टी जमते. शुभांगीची देवपुजा, रांगो्ळी काढणे, फुले वेचणे यात बरोबरीने भाग घेणे तिला फार आवडते. शुभांगी लहान मुलांशीच नव्हे तर पशुपक्षांशीही मुलांच्या भाषेत बोलते. दारात येणारे मांजर व बुलबुल व सातभाई यांना तिची भाषा कळते हे पाहून अनुषाही अगदी खूष होते. सध्या अमेरिकेत असली तरी ती सांगलीच्या माऊची चौकशी करते व सांगलीला येण्याची इच्छा व्यक्त करते.

सुमेधाचा धाकटा मुलगा ओजस अगदी वेगळ्या प्रवृत्तीचा, धाडसी, प्रखर बुद्धिमत्तेने दृक‌‌श्राव्य कथाकविता मुखोद्गत करणे व अमेरिकन संशोधकासारखे प्रकल्प तयार करणे यात तरबेज आहे.शिवाजी, राम, कृष्ण, भीम, गणपती, मारुती, शंकर अशा ऎतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखांच्या वेषात त्या त्या भूमिका वठविण्यात तो अधिक रमतो. आमच्या अमेरिकेच्या भेटीत रोज रात्री गोष्ट सांगताना अवकाशवीराच्या थाटात टॉयस्टोरीतले वुड व बझ ही मुख्य पात्रांच्या साथीने मी त्याच्याबरोबर सूर्यमालिकेतील अनेक सफरी केल्या आहेत. रोबोट बॉय, जेम्स वॅट व न्यूटन यानाही मी गोष्टीत हिरो बनविले होते. ओजस त्यात एवढा समरस होई की त्याला विज्ञानाची गुरुत्वाकर्षणासारखी तत्वेही सहज समजत असत. त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यात मला त्याच्या वडिलांचा प्रभाव जास्त जाणवला.

मुलांशी स्वतः मूल होऊन खॆळताना माणसाच्या मूलभूत मानसिक प्रवृत्तींचे दर्शन घडते. त्यात कोणताही आडपडदा वा बुरखा नसतो. प्रेम, भीती, लोभ, राग या सार्‍या भावना अभ्यासता येतात. लहान मुलापासून मोठे होत असताना आपण काय गमावले याची जाणीव होते. त्याचबरोबर एका निर्भेळ आनंदाचा लाभ आपल्याला होतो. आपल्या वृत्ती उल्हसित बनतात.
मुलांवर संस्कार करीत असताना आपल्यावरही चांगले संस्कार करण्याचे कार्य मुले करीत असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment